बोदवडमध्ये एक लाख 85 हजारांची दारू जप्त

बोदवड : मध्यप्रदेशातून औरंगाबादकडे अवैधरीत्या दारूची तस्करी होत असल्याची माहिती बोदवड पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी मंगळवारी सकाळी चारचाकी जप्त करीत तब्बल एक लाख 85 हजारांची दारू जप्त केली आहे. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून वाहनासह दारू मिळून तीन लाख 84 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड व सहकार्‍यांना दारूची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांनी बुधवारी पहाटे नाकाबंदी करीत बसस्थानकाजवळ चारचाकी (एम.एच.46 डब्ल्यू.3612) या वाहनाची तपासणी केली असता त्यात मध्यप्रदेश निर्मित दारू आढळली. त्यात मॅकडॉल, रॉयल स्टॅग, स्टीलिंग रीझर्व्ह आदी कंपनीचा मद्यसाठा आढळला. तब्बल एक लाख 84 हजारांची दारू व दोन लाख रुपये किंमतीचे वाहन मिळून तीन लाख 84 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी आरोपी अजय मोतीलाल जैस्वाल (39), बळीराम पांडुरंग तुपे, केतन कृष्णकुमार जैस्वाल (तिन्ही रा.औरंगाबाद) यांना अटक करण्यात आली. ही कारवाई पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड, उपनिरीक्षक भाईदास मालचे, वसंत निकम, गोपाळ गव्हाचे, राजेश महाजन, मुकेश पाटील, निखील नारखेडे, शशिकांत महाले, तुषार इकडे, मधुकर बनसोडे, राहुल जोहरे आदींच्या पथकाने केली. या प्रकरणी पोलिस हेड कास्टेबल मुकेश पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला.