बोगस पटसंख्या दाखविणा-या शाळांवर कारवाई करणार – विनोद तावडे

0

मुंबई : राज्यातील बोगस पटसंख्या दाखविणा-या शाळांवर कारवाई करण्याबाबत शासन गंभीर असून उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कारवाई करण्याची कार्यवाही सुरु आहे. येत्या २ महिन्यात ही कार्यवाही पूर्ण होईल. यात दोषी आढळलेल्या संबंधिताविरुध्द कारवाई करुन त्यांच्यावर आवश्यक कलमे लावण्यात येतील. तसेच बोगस पटसंख्या दाखविणा-या शाळांना पाठीशी घालण्यांविरुध्दही कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिले.

राज्यातील बोगस पटसंख्या दाखविणाऱ्या शाळांवरील कारवाई संदर्भात आशिष शेलार यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना तावडे म्हणाले, राज्यातील विशेष पटपडताळणी मोहिमेमध्ये राज्यातील १४०४ शाळांमध्ये सदर दिवशी ५० टक्के पेक्षा कमी उपस्थिती आढळून आली. विशेष पटपडताळणी मोहिममध्ये ५० टक्के कमी उपस्थिती आढळलेल्या व त्यानंतर कमी पटसंख्या असलेल्या व्यवस्थापनांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश, शिक्षण संचालक (प्राथमिक) पुणे यांनी सर्व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांना २४ जुलैला दिलेले आहेत. याप्रकरणी काही शाळा उच्च न्यायालयात गेल्या पण त्यावेळी न्यायालयाने शाळांविरुध्द कारवाई करण्याचे निर्देश दिले, असेही तावडे यांनी स्पष्ट केले.

Copy