बोगस कर्मचार्‍यांवर लाखोंचा खर्च

0

भुसावळ। ये थील औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील बोगस नोकर भरती प्रकरण समोर आल्याने स्थानिक वीज निर्मिती प्रशासनाचा भोंगळ व गलथान कारभार उघडकीस आला आहे. येथील अधिकार्‍यांनी सदर बोगस कर्मचार्‍यांच्या कोणत्याही कागदपत्रांची पुर्तता न करता तब्बल चार वर्ष 12 बोगस कर्मचार्‍यांना वेतन काढण्यात आले आहे. त्याचप्रमाणे कंपनीच्या नियमानुसार सर्व सोई-सुविधा ही त्यांना देण्यात आल्या होत्या. या सर्व बाबी लक्षात घेता या कर्मचार्‍यांना देण्यात आलेले वेतन तसेच सुविधांवर चार वर्षात लाखो रुपये खर्च झाला आहे. यात महाजनकोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे हि नुकसान भरपाई कोण करुन देणार? गेल्या चार वर्षापूर्वी दीपनगर येथे नोकर भरती झाली होती. या भरतीच्या वेळी येथील काही बड्या अधिकार्‍यांच्या संगनमताने या 12 जणांची बोगस भरती करण्यात आली होती. चार वर्षात हे कर्मचारी सर्रासपणे वेतन घेतात, त्यांना सर्व सुविधा दिल्या जातात मात्र कुणाच्याही हि बाब लक्षात न आल्यामुळे आश्‍चर्य व्यक्त होत आहे. यावरुन विज निर्मीतीचा कारभार किर्ती गांभिर्याने चालत आहे. हे दिसून येते.

स्वतंत्र विभाग असूनही दुर्लक्ष
दीपनगर येथे नोकर भरतीसाठी स्वतंत्र विभाग असून या विभागामार्फत भरती झालेल्या कर्मचार्‍यांची सर्व कागपत्रांची पुर्तता करुन मुख्यालय येथे पाठविले जातात. यासाठी एक स्वतंत्र अधिकारी व काही कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र या अधिकार्‍यांनी बोगस भरती झालेल्या कर्मचार्‍यांच्या कागदपत्रांची पडताळणी का केली नाही? तसेच अधिकार्‍यांच्याही हि बाब लक्षात आली नाही का? अशी शंका उपस्थित होत आहे.

अधिकारी, कर्मचार्‍यांकडून करण्यात आली विचारपूस
महाजनकोच्या दीपनगर येथील वीज निर्मिती केंद्रात नेमणुकीचे बनावट कागदपत्र सादर करुन तब्बल 9 जणांनी नोकरी मिळवून प्रशासनाची फसवणूक केल्याप्रकरणाच्या चौकशीस प्रारंभ झाला. तालुका पोलीस ठाण्याचे परीविक्षाधीन पोलीस अधिकारी मनीष कलवनिया यांनी पथकासह दीपनगर येथील प्रशासकीय विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडे विचारपूस केली. या प्रकरणी दीपनगरचे प्रशासकीय अधिकारी एकनाथ बोरोले यांच्या फिर्यादीवरुन तालुका पोलिसात या नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चौकशीला आला वेग
येथील कर्मचारी योगेश पाटील याने काही उमेदवारांकडून पैसे घेवून त्यांना महाजनकोचे बोगस नियुक्तीपत्र देऊन त्यांना दीपनगर येथे नोकरीस समाविष्ठ करुन घेतले होते. दरम्यान नविन भरती झाली असता हि बाब उघडकीस आली. जिल्ह्यातील 21 जणांना बोगस नियुक्तीपत्र देऊन उमेदवारांकडून पैसे घेऊन पाटील याने करोडो रुपयांची माया जमा केली असल्याचे पोलीसांसमोर उघडीस आले आहे. अजून किती जणांची बोगस भरती दीपनगर येथे झाली आहे. याबाबतही चौकशीची मागणी संघटनेकडून करण्यात आली आहे.

अधिकार्‍यांवर टांगती तलवार
तसेच दीपनगर येथे झालेल्या बोगस भरती प्रकरणात अजून कोणते अधिकारी यात समाविष्ठ आहेत हे तपासातूनच निष्पन्न होईल. सदर नोकर भरती प्रकरणात चार वर्षापूर्वी झालेल्या भरतीमध्ये अधिकार्‍यांच्या समाविष्ठ असलेल्या शोधात पोलीस यंत्रणा कार्यान्वीत आहे. उघडकीस आलेल्या नावांपैकी नऊ उमेदवारांकडून प्रत्येकी 10 ते15 लाख रुपये घेतले असल्याचे समजते. मात्र जे प्रकरण उघडकीस आले नाही. त्यांच्याकडून किती रक्कम घेतली असेल हे तपासात निष्पन्न होईल.