बेस्ट बसची मोटारसायकलला धडक इसमाचा मृत्यू

0

मुंबई – बेस्ट बसची धडक लागून झालेल्या अपघातात विठ्ठल लक्ष्मण कटके या 43 वर्षांच्या इसमाचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी अंधेरी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून आरोपी बसचालक गावंड याला पोलिसांनी अटक केली आहे. हा अपघात शनिवारी सकाळी साडेदहा वाजता अंधेरीतील एन. सी. फडके रोडवरील साईवाडी, दिव्यसागर हॉटेलसमोर झाल्याचे पोलिसांनी सांगितले. विठ्ठल कटके हा मीरारोड येथे राहत असून अंधेरी परिसरातील एका खाजगी कंपनीत कामाला आहे.

शनिवारी सकाळी साडेदहा वाजता तो त्याच्या मोटारसायकलवरुन कामाच्या दिशेने जात होते. दिव्यसागर हॉटेलसमोर एका भरवेगात जाणार्‍या बसची त्याच्या मोटारसायकलला धडक लागली होती. यावेळी बसच्या मागच्या चाकाखाली आल्याने विठ्ठल हा गंभीररीत्या जखमी झाला होता. अपघाताची माहिती मिळताच अंधेरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी झालेल्या विठ्ठलला तातडीने पोलिसांनी कूपर रुग्णालयात दाखल केले, मात्र तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. अपघाताला जबाबदार असलेल्या बेस्ट चालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला होता. याच गुन्ह्यांत त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला दुसर्‍या दिवशी येथील स्थानिक महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी त्याची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.