बेलगंगा कारखान्याजवळील ‘त्या’ जळीत मृत्यूचे गूढ उकलले

0

चाळीसगाव । तालुक्यातील बेलगंगा सहकारी साखर कारखाना ते भोरसे रस्त्यावर 20 फेब्रुवारी 2017 रोजी जळालेल्या स्थितीत मृतदेह मिळून आला होता. त्या जळीत मृतदेहाचे गुढ उकलले असून चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी तपास केल्यानंतर नांदगाव तालुक्यातील मयताच्या पत्नीनेच 3 प्रियकरांच्या मदतीने पतीचा खून केल्याचे उघडकीस आले असून आरोपी पत्नीसह तिघा प्रियकर आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून 10 दिवसातच खुनाच्या गुन्ह्याचा तपास करणार्‍या चाळीसगाव ग्रामीण पोलिसांचे कौतुक होत आहे. याबाबत माहिती अशी तालुक्यातील बेलगंगा साखर कारखाना ते भोरस रस्त्याच्या बाजुला अज्ञात इसमाचा जळालेल्या अवस्थेत 20 फे्रब्रुवारी 2017 रोजी सकाळच्या सुमारास मृतदेह मिळून आला होता. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करून मयताच्या डोक्याला जखमा असल्रूाने लागलीच खुनाचा गुन्हा दाखल केला होता.

गुन्हा दाखल होताच पोलिसांनी फिरविली तपासाची चक्रे
पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवून परिसरात व आजुबाजूच्या पोलिस स्टेशनला याबाबत चौकशी केल्यानंतर 24 फे्रब्रुवारी रोजी नांदगाव पोलिस स्टेशनचे हवलदार भोईर व पो.नाईक पवार यांनी चाळीसगाव ग्रामीण पोलिसांशी संपर्क साधन नांदगाव तालुक्यातील रोहिले बुद्रुक येथील काही लोक मिसींग दाखल करायला नांदगाव पोलिस स्टेशनला आले आहेत, असे सांगितल्यावरून त्यांना चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला बोलवून रोहिले बु ॥ ता.नांदगाव येथील श्रीमती राधा कैलास पवार (33) या महिलेचे हावभाव संशयीत असल्याने पोलिसांनी तिच्याबद्दल संशय आल्याने तिची कसून चौकशी करून तिने तिच्या मोबाईलवर केलेल्या कॉलवरून माहिती घेतली असता तिने तिघा प्रियकरांच्या मदतीने पतीचा खून केल्याची माहिती पोलिसांना दिली.

असा झाला खून
आजारी असल्याने त्याचे औषधी घेण्यासाठी चाळीसगाव येथे जायचे आहे असे सांगून तिचा पती कैलास रंगनाथ पवार (40 रा.रोहिले ता.नांदगाव) याला घेवून 19 फे्रब्रुवारी 2017 रोजी चाळीसगाव येथे आल्यानंतर तिचे प्रियकर – साहेबराव (तात्या), विक्रम कोळी (35), उमेश (गुड्ड्या) वना पाटील (19, दोघे रा.उंबरखेड ता.चाळीसगाव) व गौतम धना सोनवणे (22, रा.लोहारी ता.पाचोरा) यांना बोलावून सायंकाळी चाळीसगाव मालेगाव रोडवरील एका हॉटेलवर पतीला प्रियकरांच्या मदतीने दारू पाजून जेवण खाऊ घातले व खुनाचा कट रचून त्याला बेलगंगा भोरस रस्त्याजवळील रस्त्यावर नेवून त्याच्या डोळ्यात दगड घालून अर्थमेले केले व पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने त्याच्या भांगावर पेट्रोल टाकून आरोपींनी तेथून पलायन केल्याची कबुली दिल्यावरून वरील तिघा आरोपींसह सदर महिलेला चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.