बेलगंगा कारखाना गाळपासाठी सज्ज : दसर्‍याला बॉयलरचे प्रदीपन

Belgange’s boiler is finally lit : Five lakh metric tonnes of silt target this year चाळीसगाव : सनईच्या मंगल स्वरात चाळीसगाव तालुक्यातील बेलगंगा साखर कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदीपन शुभारंभ बुधवारी सकाळी कारखाना स्थळावर पार पडला. यंदा पाच लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असून मे पर्यंत कारखाना चालणार आहे. कारखाना पूर्ण क्षमतेने हंगामासाठी सज्ज असल्याचे चेअरमन चित्रसेन पाटील म्हणाले.

अधिक क्षमतेने गाळपाचे उद्दिष्ट
बेलगंगा कारखाना लोकसहभागातून उभा राहिल्यानंतर चाचणी हंगामानंतर दुसरे बॉयलर प्रदीपन झाले आहे. गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून कारखान्याच्या देखभाल व दुरुस्तीचे काम सुरू होते. त्यामुळे यंदा अधिक क्षमतेने ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांपासून गिरणा खोर्‍यात उसाची लागवड वाढली आहे. त्यामुळे यंदाही मोठ्या प्रमाणात ऊस उपलब्ध आहे.

सनईच्या मंगल स्वरात पेटला अग्नी
बेलगंगा कारखाना मध्यंतरी 10 वर्षे बंदच होता. लोकसहभागातून त्याची चाके तीन वर्षांपूर्वी फिरली. कारखान्याची गाळप क्षमता वाढविण्यासाठी गत आठ ते नऊ महिन्यांपासून विविध मशिनरींची दुरुस्ती करण्यात आली. बुधवारी सनईच्या मंगल स्वरात बॉयलर अग्निप्रदीपन करण्यात आला. आदित्य महाजन यांनी सपत्नीक पूजा केली.

गेल्या हंगामात शंभर टक्के रक्कम अदा
गत हंगामात 2100 रुपये व ऊस तोडणी आणि वाहतूक खर्चासह पेमेंट अदा करायचे होते. त्यातून 917 रुपये ऊसतोडणी व वाहतुकीचे वगळले, तर 1987 रुपये उसाचा भाव शासन नियमानुसार द्यायचा होता. प्रत्यक्षात मात्र बेलगंगा कारखान्याने दोन हजार प्रति टनाचा भाव शेतकर्‍यांना दिला. शिवाय शंभर टक्के रक्कम शेतकर्‍यांना अदा केली. कारखान्याने राज्यभरातील 200 कारखान्यांमधून चौथा क्रमांक मिळविला आहे, अशी माहिती पाटील यांनी दिली.

यांची होती उपस्थिती
यावेळी चित्रसेन पाटील यांच्यासह मोनिका पाटील, अजय शुक्ला, नीतू शुक्ला, नीलेश निकम, किरण देशमुख, रवींद्र केदारसिंग पाटील, यू. डी. माळी, शरद मोराणकर, निशांत मोमाया, राजेंद्र धामणे, डॉ. अभिजित पाटील, नारायण पाटील, आर.पी. काळे, पी. आर. मगर, कांबळे, रावसाहेब साळुंखे, अप्पासाहेब गायकवाड, धनंजय रणदिवे, सचिन पाटील, प्रभाकर पाटील, किरण सपकाळ, गणेश गोलाईत, अमित डोंगरे, रुपाली पाटील, मुकादम व ऊस शेतकरी उपस्थित होते.