बेपत्ता चंद्रयान सापडले!

0

नवी दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो)ने 22 ऑक्टोबर 2008 रोजी अवकाशात सोडलेले चंद्रयान-1चा 29 ऑगस्ट 2009 रोजी संपर्क तुटल्यानंतर ते बेपत्ता झाले होते. हे चंद्रयान अद्यापही कार्यरत असून, चंद्र ग्रहाभोवती फेर्‍या मारत असल्याचे अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने शोधून काढले आहे. कॅलिफोर्नियातील नासाच्या संशोधन केंद्रात चंद्रयानाचा उच्चक्षमतेच्या रडारद्वारे यश लागला. चंद्राच्या भूपृष्ठापासून 200 किलोमीटर अंतरावरून हे यान फिरत असल्याने नासाने जाहीर केले आहे. त्यामुळे भारताच्या आनंदात भर पडली असून, या यानाशी पुन्हा संपर्क साधण्यासाठी संशोधकांनी प्रयत्न सुरू केले होते.

बेपत्ता यानाचे काम उत्तमप्रकारे सुरू..
कॅलिफोर्नियातील नासाच्या संशोधन केंद्रात नासाने अतिउच्च क्षमतेचे रडार बसवलेले आहे. या रडारवर काम करत असताना रडार संशोधक मरिना ब्रोझोविक यांना भारताचे चंद्रयान-1 चंद्राभोवती घिरट्या घालत असल्याचे दिसून आले. हे यान संपूर्ण क्षमतेने आपले काम करत असल्याचेही यावेळी दिसून आले. दिशादर्शन, अंतराळ संशोधन आणि चंद्राविषयीची शास्त्रीय माहितीसाठी हे यान भारताने अंतराळात सोडले होते. ऑगस्ट 2009 पासून त्याचा संपर्क तुटल्यानंतर भारताने दुसरी चंद्रयान मोहीम राबवली होती. परंतु, अमेरिकन संशोधकांच्या मते गेल्या 8 ते 9 वर्षापासून हे यान आपले काम चोखपणे बजावत असून, त्याकडे आता मोठ्या प्रमाणात माहिती जमा झाली असावी, अशी शक्यताही या संशोधकांनी व्यक्त केली. इस्त्रोसह नासाचे संशोधकही या यानाशी पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते.

नष्ट झाल्याचा होता अंदाज
सापडलेले चंद्रयान हे पृथ्वीपासून 3,80,000 किलोमीटर दूर अंतरावर असून, चंद्राच्या चुंबकत्वीय क्षेत्रात आल्यानंतर ते नष्ट झाले असावे, या अंदाजातून इस्त्रोने त्याचा पुनर्शोध सोडून दिला होता. परंतु, चंद्राच्या भूपृष्ठापासून 200 किलोमीटर अंतरावरून ते परिभ्रमण करत असल्याने रडारवर स्पष्ट झाले आहे. चंद्राभोवती एक प्रदक्षिणा घालण्यासाठी या यानाला दोन तास आणि आठ मिनिटांचा वेळ लागत असल्याचेही संशोधकांनी सांगितले.