बेताल परिचारकांना घरी पाठवा

0

मुंबई । “वर्षभर सैनिक गावाकडे नसतो, तो सीमेवर पेढे वाटतो आणि सांगतो काय झाले तर, मला मुलगा झाला,” अशी मुक्ताफळे उधळली ती भाजपचे आमदार प्रशांत परिचारक यांनी पंढरपूर येथील एका जाहीर सभेमध्ये त्यांनी जवान तसेच त्यांच्या पत्नीबाबत वादग्रस्त विधान केल्यानंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रया उमटल्या. थोबाडं फोडा त्यांची, लाजा वाटल्या पाहिजेत त्यांना. जरा जरी लाज शिल्लक असेल तर त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा, बेताल परिचारकांना घरी पाठवा, असा निषेधाचा सूर महिलांमध्ये आहे. त्यातीलच या काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया….

एफआयआर दाखल करावा

आमदार प्रशांत परिचारक यांनी माणूसकीला लाजवेल असे वक्तव्य केले आहे. ज्या सैनिकांच्या जोरावर ते घरात शांत झोपा काढत आहेत, त्या सैनिकांचा व त्यांचा पत्नीचाच नव्हे तर असे करून त्यांनी संपूर्ण देशाचाच अपमान केला आहे. मुळात ते जनतेचे प्रतिनिधी नाहीत. त्यांनी पक्षाने आमदारकी बहाल केली आहे. म्हणूनच आतातरी पक्षाने त्यांना आमदारकीवरून हटवले पाहिजे. भाजपच्या जाहीर सभेत त्यांनी हे घृणास्पद वक्तव्य केले आहे. त्यामुळे याची नैतिक जबाबदारी पक्षाचीच आहे. भाजपवरही एफआयआर दाखल व्हायलाच हवा. यासाठी जनतेने आक्रकम पवित्रा घेतला आहे. आम्हीही जनतेसोबत असून पक्षावरच एफआयआर दाखल व्हावा यासाठी प्रयत्नक करणार आहोत.
– प्रीती शर्मा मेनन,
सामाजिक कार्यकर्त्या, आम आदमी पक्षाच्या नेत्या

आता मुख्यमंत्री, पंतप्रधान गप्प का?

एखादा आमदार भर सभेत देशाचे रक्षण करणार्‍या सैनिकांना खिजवणारे, त्यांच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेणारे विधान करतो, हे निंदनीय आहे. अशांची थोबाडं फोडायला हवी. असे बोलताना लाजा कशा काय वाटत नाहीत यांना ? ज्या सैनिकांच्या जीवावर आपण शांत, सुरक्षित जीवन जगत आहोत, त्या सैनिकांबद्दल इतके वाईट विचार यांच्या मनात येतातच कसे? सैनित अहोरात्र सीमेचे रक्षण करतात म्हणूनच तुम्ही सुरक्षित आहात, याचा विसर पडतोच कसा? त्यांचे आभार मानायचे सोडून अशी खालच्या पातळीवर वक्तव्य करणार्‍यांविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर कारवाई करायलाच हवी. एरव्ही महिला रक्षण, महिलांचा मान राखण्याचा आव आणणारे पंतप्रधान, मुख्यमंत्री आता गप्प का?
– चित्रा वाघ,
सदस्य, राज्य महिला आयोग

गलिच्छ मानसिकतेचे दर्शन

पंढरपूर येथील भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांनी केलेले वक्तव्य अपमानास्पद तसेच संतापजनक आहे. असे वक्तव्य करून त्यांनी जवान, त्यांच्या कुटुंबीयांनी दुखावले आहे. सोबतच सर्व राष्ट्रप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. त्यानंतर आता अनावधाने वक्तव्य केल्याचे सांगत त्यांनी माफी मागितली आहे. मात्र, हजारो, लाखो जनतेपर्यंत त्यांची ही प्रतिक्रिया पोहोचली आहे. ते ऐकल्यानंतर जे जवान शहीद झाले त्यांच्या कुटुंबीयांना, मुलांना काय वाटेल, निदान याचा विचार तरी परिचारकांच्या मनात यायला हवा होता. यातून त्यांच्या गलिच्छ मानसिकतेचे दर्शन झाले आहे. त्यांनी माफी मागितली असली तरी जवानांबाबत, त्यांच्या पत्नींबाबत त्यांच्या मनात ज्या गलिच्छ भावना आहेत त्याची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला झाली आहे. अशांना नाकरलंच पाहिजे.
– डॉ. नीलम गोर्‍हे, शिवसेनेच्या आमदार आणि प्रवक्त्या

संतापजनक

परिचारकांचे वक्तव्य संतापजनक तसेच मन उद्वीग्न करणारे आहे. आपण काय बोलतो याचे भान राखणे गरजेचे आहे. सैनिकांविषयी किंवा त्यांच्या पत्नींविषयी बोलण्याचा अधिकार कोणालाही नाही. हा केवळ सैनिकांविषयीचा, त्यांच्या पत्नींविषयीचा मुद्दा नाही, पण कोणीही स्त्रियांच्या विरोधात, त्यांच्या चारित्र्यावर चिखल उडविणारे वक्तव्य करता कामा नये. हे सर्व निषेधार्ह आहे.
– तेजस्विनी पंडीत, अभिनेत्री

त्यांनी एक दिवस तरी सीमेवर कर्तव्य बजावावे

परिचारक यांचे वक्तव्य जेव्हा मी ऐकले तेव्हा प्रचंड चीड आली. खरेतर ते सुशिक्षीत आहेत. त्यांच्या तोंडून असे बेताल वक्तव्य कसे आले याचेच आश्चर्य वाटते. ज्या सैनिकांमुळे आज आपण सुरक्षित जीवन जगतोय त्यांच्या पत्नींच्या बाबतीत असे बोलणे लज्जास्पद आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर एक क्लिप सध्या व्हायरल झाली आहे. त्याप्रमाणे त्यांनी एक दिवस तरी सीमेवर जाऊन सैनिक ज्या परिस्थितीत कर्तव्य बजावतात तसे काम करून दाखवावे. जिवाची पर्वा न करता कर्तव्य बजावणार्‍या सैनिकांबाबत करण्यात आलेल्या या वक्तव्याचा मी तीव्र निषेध नोंदवते.
– अलका कुबल, अभिनेत्री