बेगम परवीन सुलताना यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर

0

जळगाव । राज्य सरकारचा सांस्कृतिक कार्य विभागातर्फे भारतरत्न पं.भीमसेन जोशी यांच्या नावे शास्त्रीय संगीतासाठी दिला जाणारा यावर्षीचा पुरस्कार नामांकित ज्येष्ठ गायिका बेगम परवीन सुलताना यांना शुक्रवारी 17 रोजी जळगाव येथे प्रदान केला जाणार आहे. प्रतिवर्षी राज्य शासनातर्फे शास्त्रीय गायन व वादन या क्षेत्रात प्रदीर्घ काळ उल्लेखनीय कार्य करणार्‍या कलाकारास भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या नावे शास्त्रीय संगीत क्षेत्रातील जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. या पुरस्काराचे स्वरुप रु. 5 लाख रोख, मानपत्र, सन्मानचिन्ह असे आहे. यापूर्वी हा पुरस्कार गानसरस्वती किशोरी आमोणकर, संगीतमार्तंड पंडित जसराज, गानतपस्विनी प्रभा अत्रे, ज्येष्ठ सतारवादक पंडित राम नारायण यांना प्रदान करण्यात आला आहे.

ना. तावडे यांची राहणार उपस्थिती
सदर पुरस्कार सांस्कृतिक कार्यमंत्री ना. विनोद तावडे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थित बालगंधर्व खुले नाटयगृह, जळगाव येथे प्रदान केला जाणार आहे. या पुरस्कार प्रदान समारंभाला जोडूनच पं. भीमसेन जोशी स्मृती शास्त्रीय संगीत महोत्सवाचे दि. 17 ते 19 या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. दि. 17 रोजी गायिका प्रिती पंढरपूरकर, गायिका सानिया पाटणकर, सतारवादक समीप कुलकर्णी आपली कला सादर करतील तर दि. 18 रोजी गायक देबबर्ण कर्माकर, गायक धनंजय हेगडे व अभिषेक लाहिरी यांचे सरोदवादन होणार आहे. याच दिवशी बेगम परवीन सुलताना त्यांच्या सुरेल गायकीने रसिकांना मंत्रमुग्ध करतील. दि. 19 रोजी गायिका उन्मेषा आठवले, गायिका रुचिरा पंडा, बासरीवादक विवेक सोनार आपली कला सादर करतील. या महोत्सवाचे आयोजन स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान, जळगाव या शास्त्रीय संगीत क्षेत्रात कार्यरत असणार्‍या संस्थेच्या सहकार्याने संपन्न होत आहे. या कार्यक्रमास सर्व रसिकांनी आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाने केले आहे.