‘बॅग लिफ्टिंग’च्या प्रयत्नातील दोघांना अटक

0

जळगाव । शनिवार, रविवारी या दोन दिवसांच्या सुटीनंतर आज सोमवारी बँकामध्ये गर्दी असल्यामुळे या गर्दीचा फायदा घेऊन बॅग हिसकावून पळणार्‍या टोळीच्या दोन सदस्यांना चोरी करण्याच्या तयारीत असताना शहर पोलिसांच्या डिबीच्या पथकाने जेरबंद केले आहे. दरम्यान, दोन्ही चोरटे परप्रांतीय असून त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याचा पोलिसांना संशय आहे. यातच पथकाने त्यांच्याकडून एक मोटारसायकल हस्तगत केली आहे तर गेल्या दीड महिन्यापुर्वीही शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत बँक स्ट्रीटवरून एका वृद्धाच्या हातातून 17 हजारांची बॅग हिसकावून नेल्याची कबूली दोघांनी दिली. बिहारमध्ये देखील दोन ते तीन ठिकाणी बॅक लिप्टींग केल्याचेही चौकशीत पोलिसांना त्यांनी सांगितले आहे. तसेच बॅग हिसकावून दोघं मुंबईला पसार होणार असल्याचेही त्यांनी पोलिसांना सांगितले.वरूण उर्फ पुष्पेंद्र दिलीप उर्फ किशोरीलाल यादव (वय 26, रा. गुलाबगंज, जि. कटीहार, बिहार) तर दुसर्‍याचे विजयसिंग आनंदराम नट (वय 32, रा. विजयनगर, छत्तीसगड) हे ताब्यात घेतलेल्या दोघं संशयितांची नावे आहेत.

भामट्यांची पाच बँकामध्ये रेकी
31 मार्च नंतर बँकांना दोन दिवस सुटी होती. त्यामुळे सोमवारी सहाजीकच बँकांमध्ये गर्दी होणार हे नक्की होते. त्यातच शहर पोलीस ठाण्यातील कर्मचारी इम्रान सैय्यद हे पैसे काढण्यासाठी गोविंदा रिक्षा स्टॉप जवळील अ‍ॅक्सिस बँकमध्ये गेले होते. त्यावेळी गोंविंदा रिक्षा थांब्या जवळ असलेल्या अ‍ॅक्सिस बँकेजवळ विनाक्रमांकाच्या काळ्या रंगाच्या दुुचाकीवर दोघे संशयीत रित्या फिरतांना दिसले. यानंतर विजयसिंग पैसे काढणार्‍यांच्या रांगेत उभा होता. त्याने इम्रान सय्यद यांच्यासह काही नागरीकांना पैसे काढण्याचा क्रमांक दिला. याचवेळी एकाने 20 हजार काढुन बाहेर आला. त्या व्यक्तीचा पाठलाग करीत विजय बाहेर आला. मात्र ती व्यक्ती रिक्षाने निघुन गेली. त्या दरम्यानात, इम्रान सैय्यद यांनी पोनि. ठाकूर यांना दोन जण संशयितरित्या फिरत असल्याची माहिती दिली. त्यावरून ठाकूर यांनी वासूदेव सोनवणे, अक्रम शेख, इम्रान सय्यद आणि दीपक सोनवणे, गणेश शिरसाळे, मोहसीन बिरासदार यांच्या पथकाला तपासासाठी पाठविलले. त्यावेळी अ‍ॅक्सिस बँकेजवळ विनाक्रमांकाच्या काळ्या रंगाच्या दुुचाकीवर दोघे संशयीत फिरताना दिसले. त्यानंतर दोघे जिल्हा क्रीडा संकुलासमोरील स्टेट बँकेच्या शाखेत गेले. त्या ठिकाणीही त्यांनी त्याच पद्धतीने रेकी केली. पोलिसांनीही काही अंतरावर उभे राहून त्यांच्यावर पाळत ठेवली. यानंतर नवीपेठेतील त्यांनी युनियन बँक, सेंट्रल बँकेची रेकी केल्यानंतर एक संशयीत बाजुलाच असलेल्या पंजाब नॅशनल बँकेत घुसला. तर एक दुचाकीवर उभा होता. पंजाब नॅशनल बँकेत घुसल्यानंतर त्याने पैसे काढण्यार्‍यांची रेकी सुरू केली. त्याच्या मागून अक्रम शेख आणि इम्रान सय्यद हे बँकेत गेले. त्यांनी बँकेत फिरणार्‍या संशयीताला हटकले. त्यावेळी त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्याला जेरबंद केले. त्यानंतर बँके बाहेर उभ्या असलेल्या संशयीतावर वासूदेव सोनवणे आणि दीपक सोनवणे हे पाळत ठेवून होते. त्यांना इशारा करताच त्यांनी मोटारसायकलवरील संशयीताला सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास ताब्यात घेतले.

मोटारसायकल आणली रेल्वेने…
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या एका चोरट्याचे नाव वरूण उर्फ पुष्पेंद्र दिलीप उर्फ किशोरीलाल यादव (वय 26, रा. गुलाबगंज, जि. कटीहार, बिहार) तर दुसर्‍याचे विजयसिंग आनंदराम नट (वय 32, रा. विजयनगर, छत्तीसगड) असे आहे. त्यातील विजयसिंग हा वरूणचा मावसा असल्याचे त्याने सांगितले. त्यांनी छत्तीसगड येथून येताना विनाक्रमांकाची मोटारसायकल सोबत आणली होती. मध्यप्रदेशातील इटारसीपर्यंत त्यांनी मोटारसायकल चालवत आणली. त्यानंतर ती रेल्वेने रविवारी सायंकाळी भुसावळ येथे आणली. रविवारी रात्री भुसावळ येथे मुक्काम करून ते सोमवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास जळगावात आले. त्यानंतर त्यांनी बँकाची रेकी सुरू केली.

चोरी केल्यानंतर जाणार होते मुंबईला
जळगावात बॅग चोरीचे काम दाखवुन दोघं भामटे पल्सरने मुंबई पसार होणार होते. त्याआधीच दोघांना गजाआड करण्यात पोलीसांना यश आले. बॅग चोरीतील परप्रांतीयांना पोलीसांना पकडल्यानंतर त्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडून जिल्ह्यातील आणखी गुन्हे उघडकिस येवु शकतात. असा अंदाज पोलीसांकडून वर्तविण्यात आला आहे. दोघांवर बिहार व छत्तीसगढमध्ये बॅगचोरीचे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. यातच दिड महिन्यापूर्वी वृध्दाच्या हातातून 17 हजार रुपये हिसकवून चोरून नेल्याची कबूली दोघांनी दिली आहे. यातच पोलिसांनी त्यांच्याकडून पल्सर हस्तगत केली आहे.

साध्या वेशामुळे हाती लागले चोरटे
शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखे पथकातील सहाय्यक फौजदार वासुदेव सोनवणे, इम्रान सय्यद, गणेश शिरसाळे, अक्रम शेख, मोहसीन बिराजदार, दिपक सोनवणे हे पोलिस कर्मचारी साध्या वेशात असल्यामुळे चोरट्यांना सर्वसाधारण नागरिक असल्याचे वाटले. परंतू, पंजाब नॅशनल बँकेत पथकाने दोघांना पकडल्यानंतर त्यांना साध्या वेशातील नागरिक पोलिस असल्याचे माहित पळताच त्यांना घामच सुटला. यावेळी त्यांनी त्यांना हिसका देवून पळून जाण्याचा प्रयत्न केला परंतू दोघांना पथकाने पकडून ठेवत पोलिस ठाण्यात नेले व कसून चौकशी केली.