बुरूमपाड्यातील नागरिकांची पाण्यासाठी भटकंती

0

तळोदा: नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील नवे तोरणमाळ ह्या गावातील बुरूमपाड्यातील नागरिकांसमोर प्यायला पाणी नाही तर हात धुवायला येणार कुठून? असा प्रश्न उभा ठाकला आहे. हंडाभर पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. डोंगरावरील पायवाटची कसरत करून जीव धोक्यात घालून हंडाभर पाणी 3 ते 7 किमी पायी चालत आपली व जनावरांची तहान भागवित आहे. आणखी किती दिवस पाणीटंचाईचा सामना करावा लागेल, असाही प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे. गेल्यावर्षी गाढवावरून पाणी पोहचविण्याची वेळ प्रशासनावर आली होती. कारण कोयलीडाबरला जाण्यासाठी रस्ता नाही. त्यातच आता कोरोनाच्या दुहेरी सामन्यात नागरिक सापडले आहेत. कोरोनाच्या संकटातच पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत असल्याचे सद्यस्थितीला चित्र आहे.

शासनाकडे लोकसंघर्ष मोर्चातर्फे पाठपुरावा सुरू
कोरोनाच्या संकटात पिण्याच्या प्रश्‍नाबाबत शासनाकडे लोक समन्वय प्रतिष्ठान आणि लोकसंघर्ष मोर्चातर्फे पाठपुरावा सुरू आहे. गावातील सामूहिक वन व्यवस्थापन समितीनेही ठरविले आहे. आगामी उन्हाळ्यात गाव पाण्यासाठी स्वयंपूर्ण झाले पाहिजे. यासाठी सातपुड्यातील गावे, तरुण कार्यकर्ते, लोक समन्वय प्रतिष्ठान आणि लोकसंघर्ष मोर्चाच्या माध्यमातून सातपुडा संवर्धन मोहीम सुरू केली आहे. मोहिमेत सहभागी होऊन सातपुड्यातील जंगल पुन्हा उभे करण्यासाठी, सातपुड्यातील नद्या संवर्धनासाठी योगदान, तांत्रिक सहाय्य, मार्गदर्शन तसेच वस्तूच्या स्वरूपात योगदान देवून सातपुड्यातील गावांसोबत उभे राहण्याचे आवाहन लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे यांनी केले आहे.

Copy