बुराई नदीसाठी कालबध्द आराखडा तयार करा

0

धुळे : शिंदखेडा तालुक्यातून वाहणारी बुराई नदी बारमाही करण्यासाठी 20.61 कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे बुराई नदी बारमाही होण्यासाठी कालबध्द आराखडा तयार करुन त्याची अंमलबजावणी करण्यात यावी, असे निर्देश राज्याचे रोजगार हमी योजना व पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात सोमवारी दुपारी मंत्री रावल यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील विकास कामांबाबत आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.

सर्व अधिकाऱ्यांची उपस्थिती

आढावा बैठकीत जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश सांगळे, उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे (रोहयो), जिल्हा नियोजन अधिकारी एम. आर. वाडेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विनोद भदाणे, शिंदखेड्याच्या तहसीलदार गायत्री सैंदाणे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

53 बंधारे बांधण्यात येणार

मंत्री रावल म्हणाले, बुराई नदी बारमाही वाहण्यासाठी 53 बंधारे बांधण्यात येणार आहेत. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात या बंधाऱ्यांमध्ये पाणी अडवून नदी बारमाही होणे अपेक्षित आहे. त्यादृष्टीने नियोजन होणे आवश्यक असून प्रशासकीय बाबींची तत्काळ पूर्तता झाली पाहिजे. या पार्श्वभूमीवर कालबध्द कार्यक्रम तयार करावा. याबाबत लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन दुसाणे यांनी माहिती दिली. आमदार निधी खर्चाबाबतचा अहवाल तत्काळ सादर करावा. तसेच निधी वेळेत खर्च कसा होईल याचेही नियोजन करावे, अशीही सूचना मंत्री रावल यांनी दिली.

पर्यटन स्थळांच्या विकासासाठी पायाभूत सुविधा

जिल्ह्यातील पर्यटन स्थळांचा विकास करताना तेथे पर्यटकांसाठी पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. जेणेकरुन पर्यटकांची संख्या वाढेल. यावेळी पेडकाई देवी मंदिर, बळसाणे, पाटण, लळिंग किल्ला, सोनगीर किल्ल्याबाबत चर्चा झाली. पर्यटन स्थळ विकसित करताना स्थानिक तरुणांना रोजगार कसा उपलब्ध करुन देता येईल याचाही विचार झाला पाहिजे. तसेच संबंधित पर्यटन स्थळाची माहिती देणारे मार्गदर्शक (गाइड) यांना प्रशिक्षण द्यावे. पाटण येथे बहुउद्देशिय सभागृह‍ बांधण्याबाबत आराखडा सादर करावा, असेही मंत्री रावल यांनी सूचविले.

अमरावती नदीचेही होणार सुशोभिकरण

जिल्ह्यातील महत्त्वाच्या पर्यटन स्थळांविषयीची माहिती पर्यटकांना मराठी व इंग्रजीत उपलब्ध करुन देण्यासाठी फलक लावावेत. पिण्याच्या पाण्याचे प्रश्न सोडविण्यासाठी नियोजन करावे, आवश्यक तेथे सर्वेक्षण करावे. अहमदाबादमधील साबरमती नदीच्या धर्तीवर दोंडाईचा शहरातून वाहणाऱ्या अमरावती नदीच्या सुशोभिकरणासाठी सर्वेक्षण करुन महिनाभरात अहवाल सादर करावा, असेही निर्देश यावेळी मंत्री रावल यांनी दिले. यावेळी वन पर्यटन- पेडकाई येथील रस्ता, वीज व इतर कामे, ओपन जिम, निरगुळी येथे सूर नदीवर संरक्षण भिंत बांधणे, 63 केव्हीचे 100 ट्रान्सफॉर्मर, वाडी शेवाडी कॅनॉलचे सर्वेक्षण, मुख्यमंत्री ग्रामीण पाणीपुरवठा योजना, लळिंग किल्ला पर्यटन, रोजगार हमी योजना, समृध्द महाराष्ट्र कल्याण योजना आदी विषयांवर सविस्तर चर्चा झाली.