बीसीसीआय होईल वेगवान!

0

– सर्वोच्च न्यायालय १९ जानेवारीला बीसीसीआयसाठी प्रशासकांची नियुक्ती करणार
– लोढा समितीचे अध्यक्ष आर. एम. लोढा यांचे प्रतिपादन

नवी दिल्ली : बीसीसीआयचे काम अगदी सुरुळीतपणे व प्रभावी पद्धतीने होणार असल्याचे लोढा समितीचे अध्यक्ष आर. एम. लोढा यांनी सांगितले आहे. सर्वोच्च न्यायालय १९ जानेवारीला भारतीय क्रिकेट नियामक मंडळामध्ये (बीसीसीआय) प्रशासकांची नियुक्ती करणार आहे. या नियुक्ती झाल्यावर बीसीसीआयचे कामकाज अधिक जलद होईल, असे मत लोढा यांनी व्यक्त केले. ‘फक्त १९ जानेवारीची मी वाट पाहत आहे. कारण त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेले प्रशासक बीसीसीआयचे काम पाहतील आणि त्यानंतर हा कारभार जलद होण्यास मदत होईल,’ असे लोढा यांनी सांगितले.

भारतीय क्रिकेटचा अधिक विकास
लोढा समितीच्या शिफारशी स्वीकारण्यासाठी बीसीसीआयने नाक मुरडल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने २ जानेवारीला बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर आणि सचिव अजय शिर्के यांना पदच्युत करून दणका दिला होता. या शिफारसी लागू झाल्यानंतर बीसीसीआय आणि एकूणच भारतीय क्रिकेटचा अधिक विकास होणार असल्याचे अभ्यासकांचे मत आहे. लोध समितीच्या अनेक शिफारशी न्यायालयाने देखील मान्य केल्या आहेत. त्यामुळे भारतीय क्रिकेट सोबतच राज्य संघटनांमध्ये देखील खळबळ उडालेली आहे. ७० वर्षांवरील व्यक्ती क्रिकेट प्रशासनामध्ये काम करू शकत नाही अशा अनेक शिफारशीने धुरीणांची ‘विकेट’ काढली आहे.

चार क्रिकेट संघटना सर्वोच्च न्यायालयात
लोढा समितीने तीन जानेवारीला झालेल्या बैठकीमध्ये राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर मिळून एखादा पदाधिकारी एकूण नऊ वर्षे दप भूषवू शकतो, असे स्पष्टपणे म्हटले होते. पण त्याविरोधात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अधिपत्याखालील हैदराबाद, तामिळनाडू, गोवा आणि मध्यप्रदेश सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचे ठरवले आहे. याविरोधात या चारही संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या चारही संघटनांतील बऱ्याच पदाधिकाऱ्यांचा नऊ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. त्याचबरोबर १९ जुलैला न्यायालयाने दिलेल्या निर्णयामध्ये एखादा पदाधिकारी राज्य आणि राष्ट्रीय संघटनेमध्ये प्रत्येकी नऊ वर्षे पदावर राहू शकतो, असे म्हटल्याचे या संघटनांचे म्हणणे आहे.

आंध्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी जीव्हीके रंगा राजू
बीसीसीआयचे माजी उपाध्यक्ष गोकाराजू गंगाराजू यांनी आंध्रप्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या सचिवपदाचा राजीनामा दिला आहे, तर जीव्हीके रंगा राजू यांच्याकडे राज्य संघटनेच्या अध्यक्षपदाची सुत्रे गेली आहेत. असोसिएशनच्या कार्यकारिणी समितीची सोमवारी विजयवाडा येथे विजयवाडा येथे बैठक झाली आणि त्यात डीव्हीएसएस सोमायाजुलू यांच्याजागी रंगा राजू यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव मान्य करण्यात आला. अरुण कुमार यांच्याकडे सरचिटणीसपद असेल, तर व्ही. दुर्गा प्रसाद सहसचिवपदी असतील. पी.व्ही देवा वर्मा हे नवे उपाध्यक्ष असतील, तर के.एस. रामचंद्र यांच्याकडे खजिनदारपद आहे.