बीएचआर प्रकरण: पोलीस महासंचालकांनीही मागविली माहिती

0

पोलीस अधीक्षकांना आदेश: पोलीस अधीक्षक कार्यालयात दिवसभर धावपळ

जळगाव: पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून पोलीस महासंचालकांनीही तातडीने बीएचआर घोटाळ्याशी संबंधित सविस्तर व पुराव्यानिशी माहिती मागविली असून शुक्रवारी दिवसभर पोलीस अधीक्षक कार्यालयात याची धावपळ सुरु होती. दुसरीकडे पुण्यातील ठेवीदार पुणे आर्थिक गुन्हे शाखेकडे पोहचत असून त्यांच्याकडून लेखी तक्रारी नोंदविण्याचे काम सुरु झालेले आहे. जळगावात देखील अ‍ॅड.किर्ती पाटील यांच्याकडे देखील ठेवीदार धाव घेत आहेत.

पुणे आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई
गेल्या शुक्रवारी पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या 12 पथकांनी जळगावात एकाचवेळी धाडसत्र राबविले होते. सलग तीन दिवस तपासणी झाल्यानंतर बीएचआर संस्थेचा सनदी लेखाधिकारी धरम साखला, महावीर जैन, संस्थेचा कर्मचारी सुजीत बाविस्कर, विवेक ठाकरे व बीएचआर संस्थेचा अवसायक जितेंद्र कंडारे याचा चालक कमलाकर कोळी या पाच जणांना अटक करण्यात आली आहे. रविवारी त्यांची पोलीस कोठडीची मुदत संपणार आहे. कारवाईनंतर पथकाने बीएचआरच्या मुख्य कार्यालयातून तसेच संशयितांच्या कार्यालय, घरातून कागदपत्रे तसेच तांत्रिक असे ट्रकभर पुरावे संकलित केले होते. या गुन्ह्यातील मुख्य संशयित अवसायक जितेंद्र कंडारे, उद्योजक सुनील झंवर व इतर सहा जण अजून पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.

महासंचालकांचे पोलीस अधीक्षकांना पत्र
पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेने बीएचआरच्या कारवाईचे सूत्रे हाती घेतल्यानंतर आता पोलीस महासंचालक कार्यालयाकडूनही पोलीस अधीक्षकांना पत्र पाठविण्यात आले आहे. पोलीस महासंचालकांचे उपसहायक (गुन्हे) के.डी.लोहकर यांचे पत्र पोलीस अधीक्षकांना प्राप्त झाले आहे. असून या गुन्ह्याच्या संदर्भातील पुराव्यानिशी माहिती मागविली आहे. यात बीएचआर या संस्थेत फसवणूक होऊन अपहार किती रकमेचा झालेला आहे, एकूण किती गुन्हे दाखल आहेत, यात किती आरोपी आहेत व त्यांची सद्यस्थिती काय?, आतापर्यंत किती संपत्ती जप्त करण्यासाठी निविदा काढण्यात आलेल्या आहेत. किती संपत्ती अधिसूचीत करावयाची आहे व ही कारवाई पूर्ण झालेली आहे किंवा कसे, किती आरोपींना अटक करणे बाकी आहे व किती आरोपींची जामीनावर मुक्तता झालेली आहे, आदी माहिती, कागदपत्रे व इतर पुरावे मागविण्यात आली आहे.

 

 

Copy