Private Advt

बीएचआर पतसंस्थेचा घोटाळा बाहेर काढल्यानेच आपल्यामागे ईडीचा ससेमिरा : माजी मंत्री एकनाथराव खडसे

बोदवड : बीएचआर पतसंस्थेचा घोटाळा बाहेर काढल्यानेच आपल्यामागे ईडीचा ससेमिरा लावण्यात आला, असा दावा माजी महसूलमंत्री मंत्री एकनाथराव खडसे यांनी येथे शुक्रवारी शहरात झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत केला. दोन दिवसांपूर्वीच खडसे यांच्याविरोधात ईडीची कारवाई होवून त्यांना अटक करण्यात आली, नोटीस बजावली, फार्म हाऊसवर जप्ती झाली, अशा वावटळ्या सोशल मिडीयावर उठवण्यात आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली होती मात्र खडसे यांनी या सर्व अफवा असल्याचे स्पष्ट करीत विरोधकांचे षडयंत्र असल्याचे सांगत दोन दिवस खाजगी कामानिमित्त बाहेरगावी असल्याचे स्पष्ट केले होते.

याचे वडील शिक्षक मग 1200 कोटींची प्रॉपर्टी कशी?
आपल्या आक्रमक शैलीत खडसे म्हणाले की, माझे बापजादे श्रीमंत होते. त्यांची मोठी शेतजमीन आणि वाडे होते. याचे आधीपासूनचे उतारे आहेत, आपण कधीही भाड्याच्या घरात राहणारे नव्हतो तरीही आपल्या प्रॉपर्टीची दहा वेळा चौकशी करण्यात आली मात्र याचे वडिल तर साधे शिक्षक होते मग त्याने बाराशे कोटी रुपयांची प्रॉपर्टी कशी जमवली ? त्याची चौकशी का होत नाही? असा सवाल माजी मंत्री गिरीश महाजनांच्या नावाचा उल्लेख टाळत खडसे यांनी उपस्थित केला. बेनामी संपत्तीचा विचार करता हा आकडा अजून मोठा असल्याचा आरोप त्यांनी केला.

आणखी दोषी जेलमध्ये जाणार
बीएचआर पतसंस्थेचा विषय लावून धरल्याने आपल्यामागे ईडीची चौकशी लावण्यात आली. बीएचआर प्रकरणात हजारो ठेवीदार असून त्यांना आपण पैसे बुडू देणार नाही, याबाबत आश्‍वस्त केले आहे. यांच्या प्रॉपर्टी विकायला लावेल मात्र ठेवीदारांचे नुकसान होवू देणार नाही ही भूमिका घेतल्याने आज काही जण जेलमध्ये आहे शिवाय आगामी काळात काही जण जेलमध्ये निश्‍चित जातील, असा दावाही खडसे यांनी केला. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील आणि जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.