बीअर पॅरासिटामॉलपेक्षाही प्रभावी वेदनाशामक

0

लंडन । बीअर पिणार्‍यांसाठी आता एक हक्काचे आणि आरोग्याशी निगडित असे कारण मिळाले आहे. उन्हाळ्यात कसली बीअर पिता? असा सवाल आता त्यांना विचारला जाणार नाही. मद्यप्रेमींच्या बाजूने भक्कम असे आणखी एक कारण मिळाले आहे. पॅरासिटामॉलपेक्षाही बिअर ही प्रभावी वेदनाशामक असल्याचे एका संशोधनातून समोर आले आहे. यूकेमधील ग्रीनविच युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी सुमारे 400 जणांवर केलेल्या 18 सर्वेक्षणांमध्ये ही लक्षवेधी बाब समोर आली आहे. त्यामुळे फक्त हँगओवर मिळवण्यासाठी नाही तर पेन रिलिफ मिळावा यासाठी आता बिअरचे सेवन करता येईल. बिअर प्यायल्यामुळे मेंदूतील चेतातंतूंवर परीणाम होऊन वेदना शमवता येतात का, याचा अभ्यास करण्यात आला. त्यावेळी बीअरचे प्रमाण जितके जास्त, तितक्या सहभागींना वेदना कमी जाणवल्याचे संशोधकांच्या समोर आले. ‘अल्कोहोल ही अत्यंत प्रभावी वेदनाशामक असल्याचे सबळ पुरावे मिळाले आहेत.’ असे ग्रिनविच युनिव्हर्सिटीच्या ट्रेवॉर थॉमसन यांनी म्हटल्याचे ‘द सन’ या ब्रिटिश वृत्तापत्राने छापले आहे. विशेष म्हणजे पॅरासिटामॉलशी तुलना करता बीअर अधिक प्रभावी असल्याचे समोर आले आहे.

वैद्यकीयदृष्ट्या वेदनेची तीव्रता कमी करण्यासाठी बीअर ही परिणामकारक असल्याचे संशोधनात समोर आले आहे. मात्र दीर्घकालीन वेदना शमवण्यासाठी बीअर हा उपाय नसल्याचेही स्पष्ट केलंय.