बिहार विधानसभा निवडणूक: पहिल्या टप्प्यातील मतदान सुरु

0

पाटणा: कोरोनाच्या काळात होणारी पहिली निवडणूक म्हणून बिहार विधानसभा निवडणुकीकडे पहिले जात आहे. गेल्या महिन्याभरापासून बिहारमध्ये राजकीय रणधुमाळी सुरू आहे. आज बुधवारी २८ रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान होत आहे. सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. विधानसभेच्या ७१ जागांसाठी मतदान होत आहे. बिहारमध्ये संयुक्त जनता दल, भारतीय जनता पक्ष विरुद्ध राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस असा सामना आहे. संपूर्ण देशाचे याकडे लक्ष लागले आहे. तीन टप्प्यात ही निवडणूक होत आहे. ३ नोव्हेंबरला दुसऱ्या तर ७ नोव्हेंबरला तिसऱ्या अंतिम टप्प्यातील मतदान होणार आहे. १० नोव्हेंबरला एकत्रित मतमोजणी होणार आहे.

लखीसराई जिल्ह्यातील बलगुदार गावातील मतदान केंद्रावर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याठिकाणी विकास कामाच्या लोकार्पणाबाबतचे बोर्ड उघडे होते, यावर मुख्यमंत्री नितीश कुमार, उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांचे नाव होते, यावर आक्षेप घेण्यात आले. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाले होते. काही ठिकाणी किरकोळ वाद वगळता मतदान शांततेत सुरु आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती सर्व खबरदारी निवडणूक आयोगाने घेतली आहे.