बाहेरील राज्यातून होणारी वाहतूक जिल्ह्याबाहेरून करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

0

नंदुरबार : बाहेरील राज्यातून नंदुरबार जिल्हामार्गे शेजारील जिल्ह्यात किंवा राज्यात होणारी वाळू किंवा रेतीची वाहतूक नंदुरबार जिल्हा हद्दीतील रस्त्यांच्या मार्गे न करता ती जिल्हा सीमा व जिल्हांतर्गत रस्ते वगळून इतर बाहेरील मार्गांनी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले आहे.
जिल्हा सीमेलगतच्या राज्यातून नंदुरबारमार्गे इतर भागात वाळू वाहतूक सुरू आहे. या भागात कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव झाला असून शासनाकडून सदर जिल्हे रेड झोन म्हणून घोषित करण्यात आले आहेत. रेती किंवा वाळू वाहतूकदारांमुळे करोना विषाणूचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वाळू वाहतूकदारांकडून चेहऱ्याला मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, सॅनिटायझरचा वापर करणे, सार्वजनिक जागेवर न थुंकणे, पान, तंबाखू, गुटखा सेवन व मद्यप्राशन न करणे आदी निर्देशांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. शिवाय वाळू अथवा रेतीच्या वाहतूकीमुळे जिल्ह्यात रस्त्यांची दुरावस्था होत आहे. वाहू वाहतूक करताना अधिक वेगाने वाहतूक होत असल्याने वाळू वाहतूकीबाबत सामान्य नागरिकांचा रोष वाढला आहे. तळोदा-नंदुरबार मार्गावर वाळू वाहतूकदारांनी रुग्णवाहिकेला रस्ता मोकळा करून देण्याऐवजी अडथळा होईल अशी परिस्थिती निर्माण केली. या बाबी लक्षात घेता वाळू वाहतूकीमुळे कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897, मुंबई पोलीस अधिनियम 1951 आणि मोटार वाहन कायदा 1985 नुसार वरील आदेश देण्यात आले आहेत. नंदुरबार जिल्ह्याच्या सीमा क्षेत्राकरिता हा आदेश लागू राहणार आहे, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. आदेशाचा उल्लंघन करणारी व्यक्ती अथवा संघटना कायद्यानुसार शिक्षेस पात्र राहील.

Copy