बाहुबली 2 ची घोडदौड

0

मुंबई: भारतीय चित्रपटाच्या इतिहासात एक नवा विक्रम रचला गेलाय. बाहुबली 2 या चित्रपटाने 1000 कोटींची कमाई केली. तसेच हा आकडा आणखी वाढण्याची शक्यताही अजिबातच नाकारता येत नाहीय. विशेष म्हणजे अवघ्या 10 दिवसांत या चित्रपटाने हा एक हजारांचा पल्ला ओलांडलेला आहे. बाहुबली 2- द कन्क्लुजन या चित्रपटाने भारतात 800 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. तर परदेशात 200 कोटी कमावलेत. बाहुबली अजूनही हाऊसफुल सुरू आहे. त्यामुळे लवकरच 1500 कोटींचा टप्पा गाठेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

पहिल्या आठवड्यात या चित्रपटाने भारतात 534 कोटींची कमाई केली. हिंदी बाहुबली चित्रपटानेे सगळ्या चित्रपटानांना मागे टाकले आहे. दंगल या चित्रपटाने एका आठवड्यात 197.54 कोटी, तर सुलतान चित्रपटाने एका आठवड्यात 229.16 कोटी कमावले होते. तर हिंदी बाहुबली 2 या चित्रपटाने एका आठवड्यात 247 कोटींचा टप्पा गाठला आहे. पीके चित्रपटाने जगभरात 792 कोटी कमावले होते.

अमेरिकेतही हा चित्रपटाने प्रचंड हिट आहे. आजवर अमेरिकेत सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट होता दंगल. पण आतापर्यंत एस एस राजामौलीच्या बाहुबली 2 ने 100 कोटींची कमाई केली आहे.

आमीरच्या पीके-दंगलचा विक्रम मोडीत
ऑल टाईम सर्वाधिक कमाई करणार्‍या चित्रपटांच्या यादीत बाहुबली 2 नंबर वन चित्रपट ठरला आहे. बाहुबली (1000 कोटी), पीके (792 कोटी), दंगल (744 कोटी) अशी क्रमवारी आहे. त्यामुळे ऑल टाईम कमाईत मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान याचं असलेलं वर्चस्व मोडीत निघालं आहे. विशेष म्हणजे चौथ्या क्रमांकावरही बाहुबली 1 आहे. या चित्रपटाने एकूण 650 कोटी कमवले होते.

शाहरुखचा विक्रम मोडण्यात मात्र प्रभास अपयशी
ओपनिंग डेच्या कमाईत मात्र हिंदी बाहुबली 2 शाहरुख खानच्या हॅपी न्यू इयरच्या तुलनेत तोकडा पडला आहे. हॅपी न्यू इयरने पहिल्या दिवशी 45 कोटी, तर बाहुबली 2 ने 41 कोटी कमवले होते. बाहुबली 2 च्या हिंदी आवृत्तीने पहिल्या दिवशी 41 कोटींचा गल्ला जमवला. पहिल्या दिवशीच्या कमाईत प्रभासने आमीर आणि सलमानच्या चित्रपटांना मागे टाकलं असलं, तरी शाहरुखच्या सिनेमावर मात करण्यात तो अपयशी ठरला.