बालकांचे होताहेत हाल : गायरान जमिनी देण्याची सभापतींची मागणी

0

पुणे :जिल्ह्यात 1828 अंगणवाड्यांना स्वत:ची इमारत नाही. त्यामुळे बालकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. या विद्यार्थ्यांची लवकरात लवकर सोय व्हावी, या दृष्टीने माझा प्रयत्न असून, त्याबाबत जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्याकडे प्रस्ताव पाठविणार असल्याचे नवनिर्वाचित महिला व बाल कल्याण समिती सभापती राणी शेळके यांनी सांगितले.

जिल्ह्यात 4603 अंगणवाड्या आहेत. त्यांपैकी 2015 अंगणवाड्यांना स्वत:ची इमारत आहेत. मात्र, अद्याप जागेअभावी 1828 अंगणवाड्यांना स्वत:ची इमारत नाही. त्यामुळे अंगणवाड्या बांधण्यासाठी गायरान जमीन द्यावी, अशा मागणीचा प्रस्ताव लवकरच जिल्हाधिकार्‍यांना पाठविणार आहे, असे शेळके यांनी सांगितले.

मुलांना नाही हक्काचे छत
राज्य शासनाकडून एक अंगणवाडी बांधण्यासाठी 6 लाख रुपये निधी दिला जातो. मात्र, जागेअभावी अंगणवाडी बांधता येत नाही. जिल्ह्यात सध्या खासगी जागेत 479 मंदिरात 91, समाजमंदिरात 194, प्राथमिक शाळेतील वर्गात 687, इतर ठिकाणी 144 आणि ग्रामपंचायत कार्यालयाच्या जागेत 191 अंगणवाड्या भरत आहेत. इमारत नसल्यामुळे अंगणवाडीत जाणार्‍या मुलांना आज समाजमंदिर, तर उद्या खासगी खोलीत बसावे लागते. काही गावांमध्ये भाड्याच्या खोलीत अंगणवाड्या भरतात. काही अंगणवाड्या झाडाखाली किंवा मिळेल त्या ठिकाणी उघड्यावर भरविल्या जात आहेत. अंगणवाड्यांमधील बालकांना झाडाखाली किंवा ओट्यावर बसून शिक्षण व पोषण आहार घ्यावा लागत आहे, असे त्यांनी सांगितले.

जागेची उपलब्धता हीच समस्या
पूर्वी नागरिक अंगणवाड्यांसाठी जागा देत होते. आता जागांचे भाव गगनाला भिडल्याने नागरिक अंगणवाड्यांसाठी जागा देत नाहीत. ग्रामपंचायतीच्या जागा गावाच्या बाहेर आहेत. अशा ठिकाणी अंगणवाडीची इमारत बांधता येणार नाही. गावाच्या लगतच्या जमिनीवर अतिक्रमण झालेले आहे. यामुळे अंगणवाड्यांसाठी जागा मिळणे, हा प्रश्‍न कठीण झाला आहे.

पायाभूत सुविधा देणार
जिल्ह्यात जागेअभावी अनेक अंगणवाड्यांच्या इमारतीचे बांधकाम रखडले आहे. गावागावांतील गायरान जमीन अंगणवाडी बांधकामासाठी मिळाल्यास अंगणवाड्यांच्या इमारतीचा प्रश्‍न सुटेल. तेथील प्रशस्त अंगणवाड्यांमध्ये परसबागेसारखे नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणार आहे. याबाबचा प्रस्ताव लवकरच जिल्हाधिकार्‍यांना देणार आहे. त्याचबरोबर अनेक अंगणवाड्यांमध्ये पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, परिसर स्वच्छता अशा पायाभूत सुविधा नाहीत. या पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील. मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी अंगणवाडी सेविका आणि शिक्षिकांना कार्यशाळा घेऊन प्रशिक्षण देणार आहे, असेही शेळके यांनी सांगितले.