बारा दिवसांपूर्वीच साखरपुडा झाला अन् पोलीस कर्मचार्‍याचा अपघाती मृत्यू

0

शिर्डीहून कर्तव्य बजावून जळगावला परत येतांना झाला अपघात

जळगाव: कर्तव्य आटोपून नगर जिल्ह्यातील शिर्डीहून दुचाकीने घरी परतणार्‍या सागर रमजान तडवी (वय-30) रा. हंबर्डी ता. यावल ह.मु. पोलीस लाईन, जिल्हा पेठ या पोलिस कर्मचार्‍याचा भीषण अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी 5 डिसेंबर रोजी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास तालुक्यातील शिरसोली रोडवर एम एच 19 या हॉटेल जवळ घडली. यात आणखी एक पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाला असून त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान सागर तडवी याचा 22 नोव्हेंबर रोजी सागरपुडा झाला होता. लग्न करुन सुखी संसाराचे स्पन्न रंगवित असतांना काळाने त्यांच्यावर अपघाताच्या रुपाने झडप घातली.

पोलीस मुख्यालयात होते नोकरीला
सागर रमजान तडवी (वय-30) रा. हंबर्डी ता. यावल ह.मु. पोलीस लाईन, जिल्हा पेठ असे मयताचे नाव आहे. ते रामानंदनगर पोलिस ठाण्याला अगोदर कार्यरत होते. त्यानंतर ते मुख्यालयात नोकरीला होते.

जळगावात ते आईसोबत राहत होते. काही महिन्यांपूर्वी त्याची शिर्डी येथील देवस्थानाला बंदोबस्त म्हणून नेमणूक करण्यात आली होती. दर आठवड्याला जळगाव येथे आईला भेटण्यासाठी येत होते. काल शुक्रवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास पोलिस कर्मचारी संतोष बोरसे यांच्यासह सागर तडवी दुचाकीने जळगावला येण्यासाठी निघाले होते. आज पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास जळगाव-शिरसोली रस्त्यावरील देवकर वैद्यकीय महाविद्यालयाच्याजवळ हॉटेल एम एच 19 समोर अज्ञात वाहनाने सागर तडवीची दुचाकी (एम एच 19 डि एल 5370) ला जोरदार धडक दिल्याने सागर तडवी याचा जागीच मृत्यू झाला.

फैजपूर येथील मुलीशी झाला होता साखरपुडा
तर सोबत असलेला पोलिस कर्मचारी संतोष बोरसे हा गंभीर जखमी झाला आहे. जखमी झालेल्या पोलिस कर्मचार्‍याला तातडीने खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले तर मयत सागर तडवी याचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. दरम्यान पोलीस मित्र परिवार आणि नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. मयत सागर तडवी याचा 22 नोव्हेंबर रोजी फैजपूर येथील मुलीशी साखरपुडा झाला होता. पश्चात आई, दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. या घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते. प्राथमिक तपास पीएसआय रामकृष्ण पाटील करीत आहे.

Copy