बारामती, इंदापुरात पक्षांनी जनसंपर्क वाढविला

0

राष्ट्रीय समाज पक्ष आघाडीवर : भाजपचे नेते करतात राष्ट्रवादीची कामे

वसंत घुले

बारामती : बारामती, इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि राष्ट्रीय समाज पक्ष (रासप) या तीन राजकीय पक्षांनी जनसंपर्क वाढविला आहे. यात रासपने आघाडी घेतली असून इंदापूर तालुक्यात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील तळ ठोकूनच आहेत. बारामतीत भाजपमध्ये शांतता असून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी मरगळ तयार झाली आहे. लाचप्रतिबंधक संचलनालयात अजित पवारांच्या संदर्भात नागपूर उच्च न्यायालयात नुकतेच शपथपत्र दाखल केल्यामुळे राष्ट्रवादी सुन्न झाली आहे. भाजपाला ही पोकळी भरून काढण्याची संधी आहे. परंतु भाजपाचे अनेक जेष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे काम करत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. त्यामुळे भाजपच्या नेत्यांकडून फारशी अपेक्षा धरण्यात अर्थ नाही.

इंदापुरात राष्ट्रवादी पिछाडीवर

या दोन्ही तालुक्यात शिवसेनेचे व मनसेचे अस्तित्व नसल्याचे दिसून आले आहे. मागील दहा वर्षातील निवडणूकांवर नजर टाकल्यास या दोन्ही पक्षांची परिस्थिती अगदीच नगण्य आहे. बारामती तालुक्यात काँग्रेसचीही तशीच अवस्था आहे. यामुळे बारामती तालुक्यात रासपने जिरायती भागाचा दौरा करून दुष्काळी प्रश्‍नांसंदर्भात जनतेशी चर्चा केल्यामुळे रासपच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. इंदापूरमध्ये काँग्रेस व रासप यांनी जनसंपर्क चांगलाच वाढविला असून जनसंपर्क वाढविण्यात राष्ट्रवादी पिछाडीवर आहे. राष्ट्रवादीतील गटबाजी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत स्पष्टपणे दिसून येण्याइतकी आहे. इंदापुरात राष्ट्रवादीची भिस्त ही अजित पवार यांच्यावरती अवलंबून असते. मात्र, सध्या अजित पवारच अडचणीत आल्यामुळे राष्ट्रवादीला वालीच उरणार नाही. इंदापूरचे विद्यमान आमदार दत्तात्रेय भरणे यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्याच एका मोठ्या गटाची पेरणी सुरू आहे. याचा फायदा अर्थातच हर्षवर्धन पाटील यांना होणार आहे. रासप हे राष्ट्रवादीचीच मते मोठ्या प्रमाणात घेणार हे उघड आहे.

रासपला आले महत्त्व

इंदापूर आणि बारामती दोन्ही तालुके सधन असून बागायती भाग मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे एक मोठा धनदांडगा वर्ग सांभाळण्यात सर्वांचीच कसोटी असते. जवळच आलेल्या लोकसभा निवडणुकीत या दोन्ही तालुक्यांची पवार-पाटील ही राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
लोकसभेला पवार सुप्रिया सुळेंसाठी हर्षवर्धन पाटीलांकडे मदतीचा हात मागतात. तर इंदापूर विधानसभेला पाटीलांचा हात सोडून देतात. हा मागील दोन निवडणुकांचा अनुभव लक्षात घेता पवार आणि पाटील या लोकसभेला एकमेकांचे हात धरणार नाहीत, अशीही चर्चा चालू आहे. हे दोन्हीही हात सुटल्यामुळे रासपला महत्त्व प्राप्त झाले आहे. अगदीच 20-25 हजार मतांचा फरक करण्यात रासप यशस्वी होईल, असे एकंदरीत सध्याच्या परिस्थितीवरून दिसून येत आहे.

पाटील आणि पवार यांचे साटेलोटे?

इंदापूर आणि बारामतीचे राजकारण हे संमिश्र असून एकमेकांवरती अवलंबून आहेत. इंदापूर मतदार संघात पवारांचा वाढता हस्तक्षेप हा मुद्दा हर्षवर्धन पाटील सातत्याने मांडत असतात. परंतू, त्याला तीव्रतेने विरोध करीत नाहीत. हे अनेकदा दिसून आले आहे. त्यामुळे इंदापूरात रासपला महत्त्व आलेले आहे. हर्षवर्धन पाटलांना यांच्याविरुध्द संधी असतानादेखील बारामतीमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ताकत द्यावी, असे कधीच त्यांना वाटले नाही. किंबहुना हर्षवर्धन पाटील बारामतीत फिरकतही नाही. त्यामुळे पाटील पवार यांचे साटेलोटे आहे की काय? अशीही चर्चा मतदारांमध्ये सतत होत असते. मात्र कधीही या दोघांनीही याचे खंडण केले नाही.

भाजप आणि शिवसेनेचे मौन

या सगळ्या गदारोळात भाजप आणि शिवसेना मौन बाळगून आहे. या दोन्ही पक्षांचे दोन्ही तालुक्यातील स्थानिक नेते तसे पाहता राष्ट्रवादीचेच काम करतात. असा आजवरचा अनुभव मतदारांना आहे. त्यामुळेच राष्ट्रवादीला येथील निवडणूक 2014 पर्यंत सहजतेने जिंकता आल्या आहेत. परंतू, 2014 साली लोकसभेला महादेव जानकर यांनी सुप्रिया सुळे यांना काठावर पास करण्यापर्यंत नेले आणि तेथूनच बारामती आणि इंदापूरची राजकीय समीकरणे बदलण्यास सुरुवात झाली. या निवडणुकीने हा संदेश दिला की, राष्ट्रवादीने जमिनीवरच चालले पाहिजे अन्यथा काही खरे नाही, तरीसुध्दा राष्ट्रवादीतील दोन नंबरची नेते मंडळी जमीनीवर चालण्यास तयार नाहीत. याचाच फायदा विरोधकांना होत आहे. आतातरी या सर्वच राजकीय पक्षांनी सर्वसामान्य जनतेचे प्रश्‍न सोडविण्यासाठी विचार करण्याची गरज आहे.

Copy