बाबूजी आणि भाऊ ; २५ कोटी आणि ३ कोटींचे काय झाले हो?

0

जळगाव : बीएचआरचा घोटाळा उघडकीस आल्यानंतर अनेक धक्कादायक बाबींचा भांडाफोड होत असताना बाबूजी आणि भाऊ या दोन आसामींकडील २५ कोटी आणि ३ कोटींचे काय झाले ? याचीही दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे. यामधील तथ्थ्य शोधून काढण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेने हे बाबूजी आणि भाऊ म्हणजे नेमके कोण हे हूडकुन त्यांच्याकडे चौकशी करण्याची गरज निर्माण झाली आहे.

पुणे येथील आर्थिक गुन्हे शाखा बीएचआर घोटाळ्याचा तपास करत आहे. या पतसंस्थेच्या देशभरात मोठ्या प्रमाणावर मालमत्ता आहेत. बीएचआर अवसायानात गेल्यानंतर या ठिकाणी अवसायक म्हणून जितेंद्र कंडारे यांची नियुक्ती झाली. कंडारे यांनी नियमबाह्य पद्धतीने कोट्यवधी रुपये किंमतीच्या मालमत्ता कवडीमोल भावात विक्री केल्या आणि त्यातून स्वतः व आपल्या जवळच्या लोकांना आर्थिक लाभ पोहोचवल्याचा आरोप आहे. हा संपूर्ण घोटाळा १ हजार १०० कोटी रुपयांचा असल्याचा दावा राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांनी केला आहे.
गेल्या आठवड्यात पुणे येथील आर्थिक गुन्हे शाखेने जळगाव शहरात विविध ठिकाणी छापे टाकले. या प्रकरणात आतापर्यंत पाच जणांना पोलिसांना ताब्यात घेतले असले, तरी प्रमुख संशयित जितेंद्र कंडारे व व्यावसायिक सुनील झंवर फरार आहेत. त्यांच्या सहभागाची पोलिसांकडून चौकशी होणे बाकी आहे. मात्र, यानिमित्ताने बाबूजी आणि भाऊ या दोन आसामींकडील अनुक्रमे २५ कोटी व ३ कोटींचे नेमके काय झाले ? हे दोघेही एकाच जिल्ह्यातील, एकाच गावातील आहेत. या दोघांनी आपल्याकडील मोठ्या रकमा कशा पद्धतीने सेटल करून घेतल्या ? याचीही चौकशी झाली पाहिजे, असा सूर चर्चेतून ऐकायला मिळत आहे. अर्थातच या चर्चा आहेत. त्या वास्तवाला धरून किती आहेत, त्यात सत्य किती आहे हे तपासातून समोर येऊ शकते.

गोत्यात आल्यानंतर देणे फेडण्याचा प्रश्‍न
या दोन आसामींपैकी बाबूजी हे एका खेळीत जिंकले पण नंतर गोत्यातही आले आहेत. त्यानंतर बीएचआरचे देणे कशा पद्धतीने द्यायचे, असा प्रश्‍न त्यांच्यासमोर निर्माण झाला होता. पुढे जाऊन या रकमेची सेटलमेंट नियमानुसार झाली आहे का ? असाही प्रश्‍न चर्चिला जाऊ लागला आहे.

आधी ५४ लाख, मग ३ कोटी?
दुसरी आसामी असलेल्या एका भाऊंनी म्हणे, बीएचआर तेजीत असताना संचालकांवर दबाव आणून ५४ लाख रुपये घेतले होते, नंतर आपल्या जवळच्या व्यक्तीच्या नावावर जवळपास ३ कोटी रुपये बीएचआरमधूनच घेतल्याचे सांगितले जात आहे. याही रकमांचे पुढे काय झाले ? त्यांची सेटलमेंट (परतफेड) कशा पद्धतीने झाली तेही समोर येण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेने बाबूजी व भाऊ यांच्याकडेही चौकशी केली पाहिजे, असा सूर आहे.

Copy