बांधावर झाली दोन ‘गुलाबांची’ भेट

0

जळगाव – जिल्ह्याच्या राजकारणात एकमेकांचे कट्टर स्पर्धक मानले जाणारे शिवसेनेचे मंत्री ना. गुलाबराव पाटील आणि राष्ट्रवादीचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांची आज जळगाव तालुक्यातील आमोदे येथे शेताच्या बांधावर भेट झाली. या भेटीत गुलाबराव देवकर यांनी ‘तुम्ही आता पालकमंत्री आहात, त्यामुळे शेतकर्‍यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवुन द्यावी अशी मागणी केली.
जिल्ह्यात मंगळवारी वादळी वार्‍यासह गारपीट झाली. यात केळी, मका, गहू यासह रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये झालेल्या या नुकसानीची पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आज पाहणी केली. तसेच माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनीही जळगाव तालुक्यातील नुकसान झालेल्या शेती पिकांची पाहणी केली. जळगाव तालुक्यातील आमोदे याठिकाणी एकमेकांचे स्पर्धक असलेल्या या दोन्ही ‘गुलाबां’ची शेताच्या बांधावरच भेट झाली. याठिकाणी दोघांमध्ये शेतीच्या नुकसानीबाबत चर्चा झाली. माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी केळीसह ज्या शेती पिकाचे नुकसान झाले आहे त्या शेतकर्‍यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवुन द्यावी अशी मागणीही पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याकडे केली. त्यावर ना. गुलाबराव पाटील यांनीही देवकरांना आश्वस्त करीत अधिकाधिक नुकसान भरपाई मिळवुन देण्यासाठी प्रयत्न केले जातील असे सांगितले. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष वाल्मिक पाटील, गोकुळ चव्हाण यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

Copy