बांधकाम ठेकेदाराचा संशयास्पद मृत्यू

0

जळगाव। रामेश्वर कॉलनीतील प्रौढाचा मृतदेह शनिवारी सकाळी 8 वाजेच्या सुमारास गांधी उद्यानात सापडल्याने शहरात एकच खळबळ उडाली. दरम्यान, या प्रौढाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. तर प्रौढाचा गळा तारेने किंवा बारीक दोरीने आवळल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. श्रावण भगीरथ राठोड (वय 45) असे मयत प्रौढाचे नाव आहे. यातच सकाळी मृतदेह सापडल्यानंतर गांधी उद्यान परिसरात नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. पोलिसांनी घटनास्थळी आल्यानंतर संपूर्ण परिसराची पाहणी करत प्रौढाच्या मृतदेहास शवविच्छेनासाठी जिल्हा सामान्य रूग्णालात पाठविण्यात आले.

अन् गांधी उद्यानात सापडला मृतदेह
शनिवारी सकाळी 8 वाजेच्या सुमारास त्यांच्या मोबाइलवरून भाऊ संतोष याला फोन आला. फोनवरून एका व्यक्तीने श्रावण राठोड हे गांधी उद्यानात पडलेले असल्याची माहिती दिली. त्यानंतर राठोड कुटुंबियांनी तत्काळ गांधी उद्यान गाठले. त्या ठिकाणी श्रावण राठोड हे निपचीत पडलेले होते. त्यांच्या तोंडातून फेस येत होता. समोरचे चित्र बघून राठोड कुटुंबियांच्या पाया खालची जमीन सरकली.

जिल्हापेठ पोलिसांच्या मदतीने श्रावण राठोड यांना त्वरीत जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. आपतकालीन वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांची तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषीत केले. कुटुंबियांना श्रावण सोनवणे मृत झाल्याचे कळताच त्यांनी सिव्हीलमध्ये आक्रोश केला. त्यांच्या पश्चात पत्नी सकूबाई, मुलगी आरती (वय 17), मुलगा योगेश (वय 15), अजय (वय 12), वडील भगीरथ राठोड (वय 65), आई कलाबाई (वय 60) असा परिवार आहे.

विजबिल भरण्यासाठी घरातून निघाले…
रामेश्वर कॉलनीतील सप्तश्रृंगी मंदिरातजवळ राहणारे बांधकाम ठेकेदार श्रावण भगीरथ राठोड (वय 45) हे त्यांच्या कुटुंबियांसह राहत होते. शुक्रवारी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास ते विजेचे बिल भरण्यासाठी घरातून दुचाकीने (क्र. एमएच-19-सीसी-3757) 10 हजार रुपये घेऊन निघाले. रात्री उशिरापर्यंत ते घरी परत आले नाही. त्यामुळे त्यांच्या पत्नी सकूबाई राठोड, वडील भगीरथ राठोड, भाऊ संतोष राठोड, यांनी रात्रभर त्यांचा शोध घेतला. मात्र त्यांचा तपास लागला नाही. त्यांच्या मोबाइलवरही फोन करून बघितला. मात्र त्यांनी मोबाइल उचलला नाही. त्यामुळे कुटुंबियांना भिती वाटत होती.

मुळचे मध्य प्रदेशातील…
मृत श्रावण भगीरथ यांच्या गळा तारेने किंवा बारीक दोरीने आवळल्याचा संशय आहे. गळा आवळल्याने गुदमरून त्यांचा मृत्यू झाल्याचा संशय आहे. राठोड कुटुंब मुळचे मध्य प्रदेशातील बर्‍हाणपूर जिल्ह्यातील लोखंड्या गावचे आहेत. मात्र 20 वर्षापुर्वी ते जळगावात उपजिवीकेच्या निमित्ताने आले होते. सुरूवातीला बांधकाम मजूर म्हणून काम करणार्‍या श्रावण राठोड यांनी कष्टाने प्रगती केली होती. आता सध्या ते बांधकाम ठेकेदार होते. दरम्यान, राठोड यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आले नाही. मात्र, गळा आवळून त्यांचा घातपात केल्याचाही संशय नातेवाईक व पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Copy