बांगलादेशवर मात करत महिला संघ वर्ल्डकपसाठी पात्र

0

कोलंबो : मिताली राज आणि मोना मेश्राम यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर भारतीय महिला संघाने आयसीसी महिला विश्वचषक पात्रता स्पर्धेत बांगलादेशवर ९ विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवीत भारताने जूनमध्ये इंग्लंड येथे होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत प्रवेश निश्चित केला आहे. मिताली राजने बहारदार नाबाद पाऊण शतक करताना मोना मेश्रामसह 136 धावांची नाबाद भागीदारी केली आणि त्यामुळे भारताने विश्वकरंडक महिला पात्रता क्रिकेट स्पर्धेत बांगलादेशला 9 विकेट्‌स आणि 99 चेंडू राखत पराजित केले. प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशला निर्धारित ५० षटकांत ८ बाद १५५ धावांवर रोखून भारताने विजयाच्या दिशेने कूच केली.

नाबाद १३६ धावांची भागीदारी

मिताली आणि मेश्राम यांनी दुसऱ्या विकेटसाठी नाबाद १३६ धावांची भागीदारी करून ३३.३ षटकांत भारताचा विजय निश्चित केला. मितालीने नाबाद ७३, तर मेश्रामने नाबाद ७८ धावांची खेळी केली. फलंदाजीसाठी पोषक असलेल्या खेळपट्टीवर धावा करण्याची संधी मितालीला गमवायची नव्हती. मितालीने पदलालित्य आणि समयसूचकता दाखवत बांगलादेशच्या गोलंदाजांवर प्रहार केला. तिने मेश्रामच्या साथीने भारताची विजयी घोडदौड कायम राखताना सलग दुसरे अर्धशतक झळकावले. ८.३ षटकांत १ बाद २२ अशा अवस्थेत भारतीय संघ असताना मिताली आणि मेश्रामने संयमी खेळ केला. मेश्रामने ९२ चेंडूंत १२ चौकारासह नाबाद ७८ धावा केल्या, तर मितालीने ८७ चेंडूत १० चौकार व एक षटकार खेचून ७३ धावांची खेळी साकारली. प्रथम फलंदाजीला आलेल्या बांगलादेश संघाला मानसी जोशी व देविका वैद्य यांनी टिच्चून मारा करून रोखले. फरगना हक (५० धावा) आणि शर्मिन अख्तर (३५ धावा) वगळता बांगलादेशच्या इतर फलंदाजांना अपयश आले. मानसीने १० षटकांत २५ धावा देत तीन, तर देविकाने ७ षटकांत १७ धावा देत दोन बळी टिपले. भारताची स्पर्धेतील अखेरची साखळी लढत पाकिस्तानविरुद्ध रविवारी होईल.

मिताली-मोनाचाच जलवा

या सामन्यात सर्वस्वी वर्चस्व राहिले ते टीम इंडियाचे. यामध्ये खासकरून मितालीचे टायमिंग, चेंडूचे प्लेसमेंट, पदलालित्य भारत आणि बांगलादेश यांच्यातील तफावत दाखवत होते. तिच्या बहारदार खेळीने मोनाचा आत्मविश्वास उंचावला आणि बांगलादेशच्या विजयाच्या धूसर आशा दुरावल्या. दीप्ती शर्मा 22 चेंडूंत एक धाव करू शकली. ती परतली तेव्हा भारताची अवस्था 8.3 षटकांत एक बाद 22 होती. मितालीने सुरवातीस झटपट एकेरी धावा घेत दडपण दूर केले. षटकार मारून भारतास विजयी केलेली मिताली आणि मोनाने एकंदर 22 चौकार मारले.