बहुजन समाजासह शेतकरीहितासाठी राजकीय पक्षाची स्थापना

0

बोदवड : संघटनेतर्फे विविध समस्या सोडविण्यासाठी निवेदने, आंदोलने दिली जातात. यामुळे संघटनेच्या कार्यकर्त्यांवर आरोप, प्रत्यारोप होवून खटले भरले जातात. तरी एवढे करुनसुध्दा संघटनेच्या सामाजिक कार्यातून बहुजन समाजाचे व शेतकर्‍यांचे भले होवू शकत नाही. म्हणून संभाजी ब्रिगेड राजकीय पक्षाची स्थापना करावी लागली, असे प्रतिपादन अविनाश काकडे यांनी केले. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात संभाजी ब्रिगेडचे राजकीय प्रशिक्षण शिबीर घेण्यात आले. यावेळी मार्गदर्शक म्हणून अविनाश काकडे होते. अध्यक्षस्थानी पुरुषोत्तम पाटील, प्रमुख अतिथी म्हणून संभाजी ब्रिगेडचे प्रचारक अमोल मिटकरी, संजय सोनवणे, रविंद्र बावस्कर उपस्थित होते.

संघटनेत काम करण्याचे धोरण स्पष्ट असावे
पुढे बोलतांना ते म्हणाले की, संघटनेचे वक्ते, प्रचारक तयार करण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागते आणि त्रासही सहन करावा लागतो पण एकदा हे नेतृत्व तयार झाले की ते इतर पक्षात जातात आणि तेथे आपला देह झिजवितात. त्याठिकाणी कोणत्याच प्रकारचे कर्तृत्व न करताच संपतात. याचाच अर्थ म्हणजे दुसरे पक्ष आपला फक्त वापरत करतात. यापुढे असे होणार नाही. कार्यकर्ता हा महत्वाकांक्षी असला पाहिजे. आपण संघटनेत काम का करत आहोत, हे धोरण त्याचे स्पष्ट झाले पाहिजे. यातून घडलेल्या कार्यकर्त्यालाच उमेदवारी दिली जाणार असल्याचे काकडे यांनी स्पष्ट केले.

यांची होती उपस्थिती
तसेच संभाजी ब्रिगेड आगामी काळात येणार्‍या जिल्हा परिषद व पंचायत समितीसह इतर सर्व निवडणुकांना सामोरे जाणार असून कार्यकर्त्यांनी यासाठी तयार राहण्याचे आवाहन काकडे यांनी केले. यावेळी कार्याध्यक्ष अनंता वाघ, जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील, निवृत्ती ढोले, चेतन तांगडे, अल्पेश पाटील, गणेश पाटील, शैलेश वराडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.