Private Advt

बहिणाबाई चौधरी यांच्या नावाने टपाल तिकीट प्रकाशित करावे – खा. उन्मेश पाटील

जळगाव। खान्देश कन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी मराठी साहित्य विश्वात निरक्षर असतानाही आपल्या रसाळ, मधाळ आणि जीवनाचा सार सांगणार्‍या कवितांमुळे एक आगळे वेगळे स्थान निर्माण केले आहे. अहिराणी बोली भाषेतील कवितेचा हा अद्भुत चमत्कार जगभरात पोहोचण्यास टपाल तिकीटाच्या माध्यमातून मदत होणार आहे. खान्देशकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या नावाने टपाल तिकीट प्रकाशित करावे, अशी मागणी खा.उन्मेश  पाटील यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. मागणीचे पत्र दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांना दिले आहे.

खान्देशकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा जन्म जळगाव तालुक्यातील आसोदा येथे 24 ऑगस्ट 1880 रोजी झाला आहे. त्यांच्या कविता मराठी काव्यसृष्टीचा चमत्कार म्हणून युग कवयित्री निसर्गकन्या बहिणाबाई चौधरी यांना ओळखले जाते. निरक्षर असल्या तरी कवितेतून प्रकट होणारे तत्वज्ञान मोठमोठ्या तत्वज्ञान्यांनाही लाजविणारे ठरले आहे. पतीच्या निधनानंतर खंबीरपणे संसाराचा गाडा रेटणार्‍या बहिणाबाई एक आदर्श प्रतीक होत्या. त्याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असताना एखादी अडाणी आणि  निरक्षर स्त्री पूर्णपणे उद्ध्वस्त  झाली असती. मात्र, त्यांच्या कवितेतून संसारी स्त्रीची सुख-दुःखे जगत असताना अंतः स्फूर्तीने बहिणाबाईंचे काव्य स्फुरले आहे.

अनेक वर्षांपासून स्मारकाकडे दुर्लक्ष
शेती हा मुख्य व्यवसाय असताना एकत्र कुटुंब पद्धती, रितीरिवाज, सण-उत्सव, स्त्रीजीवन, सासर-माहेर, जातीची उतरंड समकालीन वास्तवाचे भिन्न भिन्न रूपे बहिणाबाईंच्या कवितेतून सार्‍या विश्वाला प्रत्ययास आल्या आहे. येणारे संदर्भ जगाला विचार करायला लावणारे आहेत. त्यांच्या कवितेतून सोशिकपणा, खंबीरतेचे दर्शन घडते. हा विचार समस्त महिलांना उभारी देणारा आहे. आदर्श कवियत्री बहिणाबाई यांचा जन्म आसोदा येथे झाल्याचा समस्त खान्देशवासियांना सार्थ अभिमान आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचे स्मारकाकडे दुर्लक्ष झाले आहे. याबाबत सातत्याने पत्रव्यवहार केला आहे. मात्र, राज्य शासनाच्या उदासीनतेमुळे अद्यापपर्यंत कामाला गती मिळाली नसल्याचे खा.पाटील यांनी नमूद केले आहे.

केंद्र सरकारने तिकीट जारी करुन आदरांजली द्यावी
खान्देशकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या नावाने टपाल तिकीट प्रकाशित करावे. जेणेकरून त्यांच्या अहिराणी बोली भाषेतील कवितेचा हा अद्भुत चमत्कार जगभरात पोहोचण्यास मदत होणार आहे. 3 डिसेंबर 1951 रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला होता. आपल्या कवितेतून मराठी साहित्यविश्वाला या अहिराणी भाषेतील कवितांनी भुरळ घालणार्‍या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या नावाने केंद्र सरकारने तातडीने टपाल तिकीट जारी करुन त्यांना आदरांजली द्यावी, अशी भावनाही खा. उन्मेष पाटील यांनी व्यक्त केली आहे.