‘बस… बस… घरात’ गाणे सोशल मीडियावर व्हायरल

0

नंदुरबार:कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण जगभर विविध उपाय योजना केल्या जात आहे. शासनाने लॉकडाऊनच्या माध्यमातून नागरिकांना घरीच थांबण्याचे आवाहन केले आहे. तरीही बाहेर फिरणार्‍या नागरिकांना जिव्हाळ्याचा सल्ला म्हणून नंदुरबार येथील देवेंद्र बोरसे नामक शिक्षकाने नावाजलेल्या ‘सैराट’ या चित्रपटातील झिंगाट गाण्याच्या चालीवर जनजागृती गीत सादर केले आहे. सध्या महाराष्ट्रभर नव्हे तर युट्युब, फेसबुक, व्हाट्सउप आणि ट्विटरच्या माध्यमातून हे गीत जगभर व्हायरल झाले आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गीताद्वारे जनजागृती

नंदुरबार येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या कार्यालयात विषय सहायक म्हणून कार्यरत असलेले शिक्षक देवेंद्रकुमार जगन्नाथ बोरसे यांनी ‘सैराट’ या गाजलेल्या मराठी चित्रपटातील नावाजलेल्या झिंगाट या गीताच्या चालीवर ‘बस… बस… घरात’ हे एक जनजागृतीपर गीत लिहून ते स्वतः गायिले आहे. या गीताच्या माध्यमातून कोरोनाची पार्श्वभूमी सांगतानाच घरी बसणे का आवश्यक आहे ? याची माहिती विषद करून, त्यांनी नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी गायलेले हे गीत सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले असून नागरिक आता ‘बस… बस… घरात’, असे म्हणून एकमेकांना घरातच बसण्याचे आवाहन करत आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सादर केलेले हे गीत तयार करण्यासाठी त्यांना संगीत संयोजक म्हणून राकेश पी.बोरसे यांनी तर ध्वनिचित्र मुद्रणासाठी निलेश पवार, उमेश पांढरकर या पत्रकार मित्रांनी सहकार्य केले. गाण्याचे ध्वनिचित्र संपादन रामचंद्र बारी यांनी केले आहे. सध्या देवेंद्र बोरसे यांनी लिहिलेले आणि गायिलेले ‘बस… बस… घरात’ हे गीत सोशल मीडियावर चांगलेच गाजत आहे.

Copy