बससेवा घोटाळा दुसर्‍या दिवशी सुनावणी

0

जळगाव । तत्कालीन जळगाव नगरपालिकेत राबविलेल्या विविध योजनांमध्ये नगरपालिकेचे नुकसान झाल्याचा ठपका लेखापरीक्षणात ठेवण्यात आलेला असल्याने त्याअनुषंगाने न्यायालयाच्या आदेशाने आयुक्तांसमोर या योजनांचे ठराव मंजूर करणार्‍या नगरसेवकांची सुनावणी घेण्यात येत आहे. या सुनावणीच्या दुसर्‍या दिवशी गुरूवार 2 मार्च रोजी 11 नगरसेवकांनी स्वतः हजेरी लावली होती.

उर्वरीत सुनावणी 6 मार्च रोजी होणार
मोफत बससेवेतील घोटाळ्यात 49 नगरसेवकांपैकी काल 12 नगरसेवकांनी हजेरी लावली होती. गुरूवारी वासुदेव सोनवणे, चंद्रकांत कापसे, सरस्वती कोळी, चुडामण पाटील, अजय जाधव, अशोक परदेशी, कैलास सोनवणे, डिंगबर पाटील, दत्तु देवराम कोळी, चत्रभूज सोनवणे, भगत बलाणी यांनी स्वतः हजेरी लावली होती. तर विजय रामदास वाणी यांनी वकीलामार्फेत हजेरी लावली होती. यानगरसेवकांवर प्रत्येकी 5 लाख 14 हजार रूपयांची वसुलीसाठी सुनावणी सुरू आहे. सर्व नगरसेवकांचे वकीलपत्र अ‍ॅड. डी. एच. परांजपे यांनी घेतले. खुलासा देण्यासाठी वकीलांनी 23 मार्चपर्यंतचा अवधी मागून घेतला असता त्यांना अनुमती देण्यात आली आहे. लेखापरीक्षक डी.आर. पाटील, लेखापरीक्षण विभागाचे अनिल बिर्‍हाडे, रविंद्र कदम उपस्थित होते. दरम्यान, आयुक्त जीवन सोनवणे मुंबई येथे स्वच्छ भारत मिशनच्या बैठकीसाठी गेल्याने 3 व 4 रोजी होणारी उर्वरीत सुनावणी 6 मार्च रोजी घेण्यात येणार आहे.