बसमध्ये चढताना चोरट्यांनी महिलेची पर्स लांबविली

0

जळगाव । गर्दीचा फायदा घेत बसमध्ये चढणार्‍या महिलेच्या पर्समधून अज्ञात चोरट्यांनी दोन तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना शनिवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास नवीन बसस्थानकावर घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरूध्द जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, लग्नसराई तसेच शाळांना लागलेल्या सुट्यांमुळे बसस्थानकांवर गर्दी होत असल्याने या गर्दीच्या फायदा घेत चोरटे हात साफ करीत असल्याच्या घटना घडत आहेत.

गोपाळ वसंत ठाकरे (वय-35) हे यवतमाळ जिल्ह्यातील कारखेडा येथील रहिवासी असून ते हिर्‍याच्या व्यापार्‍याकडे अनेक वर्षांपासून काम करतात. मात्र, रविवारी बुलढाणा जिल्ह्यातील जामठा येथे ठाकरे यांच्या मित्राचे लग्न असल्यामुळे ते शनिवारी पत्नी मयुरी ठाकरे, सुरेश ठाकूर, किसन भालेराव हे सुरत भुसावाळ पॅसेंजरने सकाळी 9 वाजता जळगावात आले. त्यानंतर चौघे त्यानंतर चौघे बसस्थानकाकडे आले. त्या ठिकाणी 10 वाजेच्या सुमारास औरंगाबाद बसमध्ये चढताना खूप गर्दी होती. त्यामुळे अर्ध्यातून ते खाली उतरले. त्यानंतर बाजुला उभ्या असलेल्या दुसर्‍या औरंगाबाद बसमध्ये ते चढले. बसमध्ये बसल्यानंतर मयुरी ठाकरे यांच्या पर्सची चेन उघडी असलेली त्यांना दिसली. त्यांनी पर्स तपासल्यावर छोटी पर्स गायब झाल्याची दिसून आली. त्या पर्समध्ये दोन तोळे सोन्याचे दागिने, दोन हजार रुपये रोख असा एकूण 55 हजारांचा ऐवज होता. तो चोरट्यांनी लंपास केल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी पती गोपाळ ठाकरे यांना या बाबत सांगितले. त्यांनी तत्काळ खाली उतरून शोध घेतला. मात्र त्यांना काहीच सापडले नाही. त्यानंतर सर्वांनी गाडीतून उतरून जिल्हापेठ पोलिस ठाणे गाठले. त्या ठिकाणी त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.