बळी घेता यावे या दृष्टीने क्षेत्ररक्षणाचे पूर्ण स्वातंत्र्य

0

मुंबई। बळी घेता यावे या दृष्टीने क्षेत्ररक्षण लावण्याचे विराट कोहलीकडून मला संपूर्ण स्वातंत्र्य मिळते. मी स्वत:च्या डावपेचानुसार क्षेत्ररक्षण लावतो, असे वेगवान गोलंदाज उमेश यादवचे मत आहे. टीममध्ये खेळताना गोलंदाजाला आपल्या मनाप्रमाणे क्षेत्ररक्षण करण्यासाठी कर्णधाराचे पूर्ण सहकार्य लागते. भारताचा कर्णधार विराट कोहली हा मला व सर्वच गोलंदाजांना गोलंदाजी करताना क्षेत्ररक्षणाबाबत स्वातंत्र्य देतो. त्यामुळेच मला चांगले यश मिळते, असे उमेश यादवने सांगितले.

विविधता वाढविण्यावर भर
“कोहली हा गोलंदाजांचा कर्णधार आहे. तो एखाद्या गोलंदाजाकडे चेंडू सोपवीत क्षेत्ररक्षकांची व्यूहरचना करण्याचे सर्वाधिकार त्याला देत असतो. कोणत्या ठिकाणी कोणते क्षेत्ररक्षक पाहिजेत, असे तो आम्हाला विचारतो व त्यानुसार व्यूहरचना करीत असतो. गोलंदाजांच्या योजनांची व कल्पनांची तो पाठराखण करतो. समजा, हे नियोजन फसले तर त्याऐवजी कसे नियोजन केले पाहिजे, याबाबत तो लगेच मार्गदर्शन करतो. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना बाद करणे हे आव्हानच असते. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध मी काही अस्त्रे राखीव ठेवली आहेत. इनस्विंग गोलंदाजीवर मी सध्या भर दिला आहे, तरीही माझ्या गोलंदाजीतील विविधता वाढविण्यावर माझा भर असतो,” असे यादवने सांगितले.

कुंबळे यांच्या मार्गदर्शनाचा फायदा
कर्णधार विराटसोबतच यादवने प्रशिक्षक अनिल कुंबळे यांचेदेखील आभार मानले आहेत. याबाबत यादव म्हणाला, “बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत मला अपेक्षेइतके भरपूर यश मिळाले नाही. तरीही माझी इनस्विंग गोलंदाजी समाधानकारक झाली होती. आमचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी केलेल्या मार्गदर्शनाचा मला खूप फायदा झाला, तरीही माझ्या गोलंदाजीत आणखी सुधारणांची आवश्यकता आहे. प्रत्येक दिवस माझ्यासाठी शिकण्याची संधी असते,” असेही यादवने सांगितले. बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शकीब अल हसनने नुकत्याच झालेल्या भारताविरुद्धच्या कसोटीत यादवचे प्रभावी गोलंदाजीबाबत कौतुक केले होते.