बळीरामपेठेतील साईबाबा मंदिरात चोरीचा प्रयत्न

0

जळगाव । बळीराम पेठेतील साईबाबा मंदिरातील खिडकीची ग्रील तोडून चोरटे मंदिरात प्रवेश करण्याच्या प्रयत्नात होते. मात्र, ग्रील तोडत असतांनाच अलर्ट अलार्म वाजल्याने चोरट्यांनी तेथून पळ काढला. यानंतर काही मिनिटातच मंदिर संस्थानचे सदस्य घटनास्थळी येवून त्यांनी आजू-बाजुच्या परिसरात पाहणी केली परंतू त्यांना त्या ठिकाणी कोणीही मिळून आले नाही.

खिडकीची ग्रील तोडण्याचा प्रयत्न
बळीरामपेठेत साईभक्तांचे श्रद्धास्थान, साईबाबा मंदिर आहे. सोमवारी रात्री नेहमीप्रमाणे मंदिराचे पुजारी श्रीराम जोशी यांनी मंदिर बंद करून घरी निघून गेले. यानंतर मंगळवारी पहाटे 4 वाजेच्या सुमारास चोरट्याने टॉमीच्या सहाय्याने रेल्वे लाईनच्या बाजून असलेल्या खिडकीची ग्रील तोडण्याचा प्रयत्न केला. ग्रील तोडण्याचा प्रयत्न करीत असतांनाच मंदिरात लावण्यात आलेले सेन्सर अलर्ट अलार्ट वाजण्यास सुरूवात झाली. अलार्म वाजताच चोरट्यांनी त्या ठिकाणाहून धूम ठोकली. यातच संस्थेचे उपाध्यक्ष ज्ञानेश्‍वर काशिनाथ बारसे यांना अलर्ट अलार्म मशिनद्वारे पाठविण्यात आलेल्या मेसेजने त्यांना जाग येताच मंदिरात कुणी तरी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला असल्याचा संशय त्यांना आला.

तात्काळ आशिष जोगी व राहुर घारपुरे तसेच पुजारी श्रीराम जोशी यांना फोन करून मंदिरा ठिकाणी येण्याचे सांगितले. सर्वजण घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी मंदिर परिसराची पाहणी केली. मात्र, त्यांना कोणीही आढळून आले नाही. यानंतर दुपारी 12.30 वाजता ज्ञानेश्‍वर बारसे यांनी शहर पोलिस स्टेशनात येवून चोरीचा प्रयत्न झाल्याची माहिती दिली. डिबी पोलिस कर्मचारी संजय शेलार यांनी घटनास्थळी जावून मंदिराची पाहणी करत सीसीटीव्ही फुटेज तपासले. मात्र, त्यांना त्यांना कोणीही दिसून आले नाही.