बलात्कार पिडीतेचा अपमान केल्याप्रकरणी गृहराज्यमंत्री केसरकर यांच्याविरोधात तक्रार

0

मुंबई- #MeToo या मोहिमेला वेग आले आहे. अन्याय ग्रस्त या मोहिमेद्वारे आपली आपबिती मांडत आहे. दरम्यान एका सामूहिक बलात्कार पीडितेच्या आईने महाराष्ट्राचे गृहराज्य मंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात अपमान केल्याचा आरोप केला आहे. एवढेच नाही तर माझ्याविरोधात आणि माझ्या बलात्कार पीडित मुलीविरोधात अपशब्द वापरून आमचा अपमान केल्याचेही या महिलेने म्हटले आहे. या प्रकरणी मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान गृहराज्य मंत्री दीपक केसरकर यांनी मात्र हे आरोप फेटाळले आहेत. मी अशा प्रकारे कोणत्याही महिलेचा अपमान केलेला नाही. बलात्कार पीडित मायलेकींशी बोलताना मी कोणतेही अपशब्द वापरलेले नाहीत असे म्हणत त्यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.

२०१७ मध्ये माझ्या अल्पवयीन मुलीवर सात जणांनी सामूहिक बलात्कार केला. यानंतर पोलिसांत तक्रार दाखल केली असता पोलिसांनी फक्त एका नराधमाविरोधात तक्रार दाखल केली इतर सहा जणांना मोकाट सोडले. ज्यानंतर मी दाद मागण्यासाठी मी गृहराज्य मंत्री दीपक केसरकर यांना भेटले. मी त्यांच्या कार्यालयात गेले होते त्यावेळी ते माझ्या अंगावर खेकसले. तुमची लायकी काय आहे? जास्त बडबड करू नका असे म्हणत मला आणि माझ्या मुलीला हाकलून दिले असे या महिलेने म्हटले आहे.

मात्र हे सगळे आरोप दीपक केसरकर यांनी फेटाळून लावले आहेत. पीडित मुलीला न्याय मिळावा म्हणून मी माझ्या परिने सर्वतोपरी प्रयत्न केले. जेव्हा ही महिला आणि तिची मुलगी मला भेटण्यासाठी माझ्या कार्यालयात आले होते त्यावेळी माझ्या कार्यालयात २० ते २५ लोक होते. जे काही घडले ते सगळ्यांनी पाहिले ही महिला जो दावा करतेय त्यात तथ्य नाही. अल्पवयीन मुलीसोबत जे घडले ते क्लेशदायकच आहे. मी त्यांना माझ्या परिने दिलासा देण्याचा प्रयत्न केला खेकसलो नाही आणि अपमान तर मुळीच केला नाही असे दीपक केसरकर यांनी म्हटले आहे.

Copy