बलात्काराच्या धमकीविरोधात गुरमेहर कौरची दिल्ली महिला आयोगाकडे धाव

0

नवी दिल्ली । दिल्लीतील श्री राम महाविद्यालयाची विद्यार्थिनी गुरमेहर कौर हिला बलात्काराची धमकी आल्यानंतर कौर हिने दिल्ली महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. त्यावर आयोगाने दिल्ली पोलिसांना पत्र लिहून कौर व तिच्या कुटुंबाला सुरक्षा पुरवण्याचे निर्देश दिले. त्यानुसार कौरच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मागील आठवड्यात रामजस महाविद्यालयात वादंग माजल्यानंतर कौर हिने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विरोधात मतप्रदर्शन केले होते.

कौरने सामाजिक संकेतस्थळावरून विद्यापीठ परिसरात शांतता प्रस्थापित होण्यासाठी मोहीम सुरू केली. त्यामुळे तिला ऑनलाइन बलात्काराची धमकी आली. त्याची महिला आयोगाने गंभीरतेने दखल घेत धमकी देणार्‍यांच्या विरोधात त्वरित फौजदारी कारवाई होणे गरजेचे असल्याचे आयोगाने पोलीस आयुक्त अमूल्य पटनायक यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे. आयोगाने कौरच्या सुरक्षेसाठी होमगार्ड दिले आहेत, आम्ही तिच्यासोबत दिवस रात्र आहोत. दिल्ली पोलीस या प्रकरणात तातडीने करवाई करतील अशी आशा आहे, असेही महिला आयोगाने म्हटले आहे. दिल्ली विद्यापीठाच्या रामजस महाविद्यालयातील अभाविप च्या हिंसाचारानंतर अन्य विद्यापीठातील विद्यार्थ्यांकडूनही अभाविपच्या विरोधात सामाजिक संकेतस्थळावरून मोहीम राबवली गेली. कारगील लढ्यातील हुतात्मा मनदीप सिंग यांची मुलगी गुरमेहर कौर हिने विशेष पुढाकार घेतला होता.