Private Advt

बर्‍हाणपूरच्या महिलेचा नायगावात खून : आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

मुक्ताईनगर : 42 वर्षीय महिलेच्या खुनाचा उलगडा करण्यात मुक्ताईनगर पोलिसांना यश आले असून अवघ्या 12 तासात पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. मुक्ताईनगर तालुक्यातील धाबे नायगाव शिवारात विहिरीत एका महिलेचा मृतदेह आढळला होता मात्र ही आत्महत्या नसल्याचे स्पष्ट झाले असून लग्नाच्या तगाद्यामुळे आरोपीने महिलेला विहिरीत ढकलल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेत अफसानाबी गुलाम इंद्रीस (42, रा.हजरत भिलाल मस्जिद, बर्‍हाणपूर, मध्यप्रदेश) या महिलेचा मृत्यू झाला तर आरोपी शेख गुलाम इंद्रीस गुलाम हुसेन (रा.हरीपुरा, बर्‍हाणपुर) यास अटक करण्यात आली. दरम्यान, आरोपीस सोमवारी न्यायालयात हजर केले असता 5 पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

लग्नाच्या तगाद्यामुळे महिलेचा काढला काटा
बर्‍हाणपूरच्या अफसानाबी बी.गुलाम इद्रीस यांची आरोपी शेख गुलाम इंद्रीस गुलाम हुसेन यांच्याशी ओळख होती व त्यातून वाढलेल्या संबंधानंतर महिलेने लग्न करण्यासाठी आरोपीकडे तगादा लावला होता मात्र आरोपीला लग्न करावयाचे नसल्याने त्याने महिलेला मुक्ताईनगर तालुक्यातील तालुक्यातील धाबे शिवारात आणल्यानंतर रवींद्र पोहेकर यांचे शेतातील विहिरीत दोन दिवसांपूर्वी ढकलून दिले होते व रविवार, 27 रोजी सायंकाळी साडेसात वाजता महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. सुरुवातीला या प्रकरणी अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली.

अवघ्या 12 तासात गुन्हा उघड
अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय अधिकारी कुणाल सोनवणे, पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे, राहुल बोरकर, हवालदार गणेश मनुरे, नाईक संतोष नागरे, मोतीलाल बोरसे, सुरेश पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. खबर्‍यांचे नेटवर्क व गोपनीय माहितीनंतर अवघ्या बारा तासात संशयीत आरोपी शेख गुलाम इंद्रीस यास ताब्यात घेतल्यानंतर गुन्ह्याची उकल झाली. आरोपीने महिलेला विहिरीत ढकलल्यानंतर ती बाहेर येवु नये यासाठी विहिरीत सोडलेल्या मोटारीचे पाईपही कापून टाकल्याची बाब उघड झाली आहे. या प्रकरणी मयत महिलेचा भाऊ शेख फरीद शेख मुसा याच्या फिर्यादीवरुन आरोपी शेख गुलाम इंद्रीस याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपनिरीक्षक शेवाळे करीत आहेत.