Private Advt

बया बयाऽऽ, प्राचार्यांना फुटला की घाम !

जळगाव – सध्या प्राचार्य हैराण आहेत; घाबरले आहेत. कारण, त्यांनी प्राध्यपकांचे दोन दिवसांचे आणि कार्यालयीन कर्मचार्‍यांचे एक दिवसांचे जे वेतन कापले आहे, त्यावर एका ‘चळवळ्या’ व्यक्तीने थेट सर्वेक्षणच हाती घेतले आहे. त्यामधील प्रश्‍न पाहून एकेकाला घाम फुटू लागला आहे. या सर्वेक्षणातून नसती आफत आपल्यासमोर उभी राहू नये या विचाराने प्राचार्य काळजीत पडले आहेत.

कोविडच्या महामारीमुळे राज्य सरकारसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे राज्यातील उद्योग क्षेत्रासह राज्य सरकारच्या सेवेतील अधिकारी व कर्मचार्‍यांनीही आपले ठराविक दिवसांचे वेतन सरकारजमा केले. शैक्षणिक क्षेत्रातही प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांचे अनुक्रमे दोन व एक दिवस याप्रमाणे वेतन कापून संबंधित प्राचार्यांनी ते सरकारी निधीत जमा करावे, असे आदेश झाले मात्र, महाविद्यालय स्तरावर ही प्रक्रिया राबविताना नियमांचे पालन कसे झाले, सक्ती तर केली नाही यासह विविध मुद्यांची ‘कुंडली’ मांडण्याचा प्रयत्न खान्देशातील एक ‘चळवळ्या’ व्यक्ती करत आहे. त्यासाठी त्यांनी ऑनलाईन प्रश्‍नावली तयार करून ती व्हायरल केली आहे. त्यामध्ये जे काही प्रश्‍न आहेत, त्यामुळेच प्राचार्यांचे धाबे दणाणले आहे. सर्वेक्षणाची प्रश्‍नावली कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संलग्नित अनुदानित महाविद्यालयातील कर्मचारी व प्राध्यापक यांच्याकडून भरून घेतली जात आहे.

मदत की खंडणी वसुली ?

सर्वेक्षणाचा हेतू नकारात्मक नाही. मदत ही नम्रपणे मागून घेतली जाते की खंडणीप्रमाणे वसूल केली जाते एवढाच शोध या सर्वेक्षणातून घ्यायचा आहे. उत्तरदात्याचे नाव गोपनीय राहील. या सर्वेक्षणातून प्राप्त माहितीचे विश्लेषण करून अंतिम निष्कर्ष शासनास सादर करण्यात येतील, असे प्रश्‍नावलीच्या प्रस्तावनेत म्हटले आहे.

प्रश्‍नावलीत एकूण 15 प्रश्‍न आहेत

प्रश्‍नावलीत एकूण 15 प्रश्‍न विचारण्यात आले असून त्यातील निवडक प्रश्‍न पुढीलप्रमाणे आहेत

प्रश्‍न 2 ) मदतनिधीसाठी शासनाने आवाहन केल्यानंतर महाविद्यालय कर्मच्यार्‍यांसाठी तशी स्वयंस्पष्ट सूचना काढते का?
पर्याय – अ) होय, आ) नाही, इ) सोयीनुसार

प्रश्‍न 4 ) महाविद्यालय प्रशासनाने/ प्राचार्यांनी कर्मचार्‍यांसाठी काढलेल्या मदतनिधी देण्याच्या आवाहन सुचनेसोबत शासन निर्णय, संचालक, सह्संचालकांचे पत्र सोबत जोडलेले असते का?
पर्याय – अ) होय, आ) नाही, इ) सोयीनुसार

प्रश्‍न 8 ) शासनाच्या मदतनिधी देण्याच्या आवाहनाबाबत कर्ज असल्याने किवा वैचारिक दृष्ट्या पटत नसल्याने एखाद्या कर्मचार्‍याने मदत निधी देण्यास नकार दिल्यास किवा हरकत घेतल्यास महाविद्यालय प्रशासन/प्राचार्य त्याकडे कसे पहाते?
पर्याय – अ) प्राचार्य पदाला दिलेले आव्हान मानतात.
आ) आपले ऐकत नाही म्हणून डाव ठेवून नंतर वचपा काढतात.
इ) संस्थेच्या विरोधातील वागणूक मानतात.
ई) मदत निधी देण्यास नकार देणार्‍या कर्मचार्‍यास संस्थेपुढे उभे करतात.
उ) मदत न देणारा माणूस चांगला नसल्याचा अपप्रचार करतात.
ऊ) आनंदाने स्वीकारून आपला ऐच्छिक निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असल्याचे प्रोत्साहन देतात.

प्रश्‍न 10) शासनाच्या मदतनिधी देण्याच्या आवाहनाबाबत काम करतांना महाविद्यालय प्रशासनाचे/ प्राचार्यांचे वर्तन खालीलपैकी कसे वाटते?
पर्याय – अ) मदतनिधीसाठी विचारणा करण्याचे
आ) खंडणी वसूल करण्यासारखे
इ) स्वत: नामानिराळे राहून संस्था, शासन, सहसंचालक यांची भीती दाखवून मदत निधी वसूलण्याचे

प्रश्‍न 13) महाविद्यालय प्रशासन/प्राचार्य शासनाच्या मदतनिधी देण्याच्या आवाहनाच्या अमलबजावणीस कर्मच्यार्‍यांच्या दमनाची उत्तम संधी म्हणून पहाते का?
पर्याय- अ) होय, आ) नाही