Private Advt

बदलत्या वातावरणामुळे जामनेर तालुक्यात सर्दी-खोकल्यांच्या रुग्णांमध्ये वाढ

 

जामनेर। शहरासह तालुकाभरात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला आहे. दिवसभर असणार्‍या ढगाळ वातावरणामुळे परिसरात चांगलाच थंडावा निर्माण होत आहे. अचानक बदललेल्या वातावरणाचा शरीरावर परिणाम होत असल्याने सर्दी, खोकला व दमा रुग्णांमध्ये वाढ होत आहे. त्याचा परिणाम विशेषतः लहान बाळ व वयोवृद्ध नागरिकांना जास्त प्रमाणात होत आहे. बदलत्या वातावरणामुळे सर्दी-खोकल्यांच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून वातावरणात अचानक बदल होत असल्याने तालुक्यातील नागरिक संमिश्र ऋतूंचा अनुभव घेत आहेत. आठ -दहा दिवसात अधून मधून सूर्यदर्शन होत आहे. ऊन व सावल्यांचा खेळ पहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी तालुकावासियांनी पहाटेच्या दाट धुक्याचा अनुभव घेतला होता.

दिवसभर गारवा असल्याने उबदार कपड्यांसह चहाची सुध्दा मागणी वाढली आहे. रब्बी हंगामातील गहू, हरभरा आदी पिकांना थंडी पोषक असली तरी ढगाळ हवामानामुळे कांदा पिकाला मात्र त्याचा फटका बसला आहे.गेल्या 15-20 दिवसांपासून सर्दी, खोकला, ताप, व्हायरल संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये तिप्पट वाढ झाल्याचे चित्र दिसत आहे. नागरिकांनी पॅनिक न होता वेळेवर उपचार घ्यावे. याप्रमाणे काही दिवसांपूर्वी टाईफाईडच्या रुग्णांमध्ये वाढ दिसून येत आहे. घरातील एक सदस्य आजारी पडला की, तो बरा होत नाही. तोपर्यंत बदलत्या वातावरणातील व्हायरलमुळे घरातील इतरही सदस्य आजारी असल्याचे चित्र घरोघरी दिसून येत आहे. त्यामुळे शक्यतो घरातही मास्कचा वापर करून व्हायरलला आळा घालावा. कोणताही आजार अंगावर जास्त वेळ न काढता तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा.

वातावरणातील गारव्यामुळे सर्दी, खोकला व तापाचे रुग्ण वाढत असल्याने सरकारी व खासगी दवाखान्यामध्ये गर्दी वाढू लागली आहे. ग्रामीण भागात लहान मुलांमध्ये आजाराचे प्रमाण वाढल्याने पालकांमधून चिंता व्यक्त केली जात आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेमुळे ग्रामीण भागात व्हायरल आजारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दिवसभर थंडी असल्याने ग्रामीण भागात दिवसासुद्धा शेकोट्या पेटू लागल्याचे सद्यस्थितीला चित्र दिसून येत आहेत.

सद्यस्थितीत ऊन, पाऊस, थंडी अशा वातावरणामुळे मानवी शरीरावर परिणाम होत आहे. वातावरणातील बदलामुळे सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढत आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता काही त्रास झाल्यास तात्काळ डॉक्टरांशी संबंध साधावा. प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेऊन कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्कचा वापर करावा. प्रत्येकाने कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी.
– डॉ.राजेश सोनवणे, तालुका वैद्यकीय अधिकारी, जामनेर