बदनामीच्या भितीने अल्पवयीन मुलीने जाळून घेतले

0

धुळे । शहरातील देवपूर परिसरातील एकता नगरमध्ये राहणार्‍या एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीने येथील एका तरूणाच्या छळाला कंटाळून स्वताच्या अंगावर रॉकेल ओतून जाळून घेतल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी घडली. येथील एकता नगर मध्ये राहणार्‍या (निशा) नाव बदललेले आहे. या मुलीचा काही दिवसापासुन येथील तरूण मनतोष ताराप्रकाश यादव हा सतत छेळत होता. माझ्याशी लग्न कर, माझ्याशी फोनवर बोल असा आग्रह धरत तीचा सतत पाठलाग करत होता. दरम्यान हा प्रकार मुलीने आपल्या घरी सांगीतल्यावर तीचे वडील मनतोषच्या घरी पोहचले. त्याठिकाणी मनतोषचे आई वडील यांनी मुलाला समज देण्याऐवजी मुलीच्या वडीलांना शिवीगाळ करून दमबाजी केली असल्याचे पिडीत मुलीने पोलीसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. आपल्या वडीलांचा अपमान मुलीला सहन न झाल्यामुळे शुक्रवारी तीने स्वताच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. यात मुलगी गंभीर प्रमाणात भाजली असून तीला उपचारासाठी शहरातील खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या प्रकरणी मनतोषसह त्याच्या आई वडीलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.