सेवालाल महाराजांचे जागतिक दर्जाचे स्मारक उभारणार-मुखमंत्री

0

वाशीम- बंजारा समाजाला आज अनेक समस्या भेडसावत आहे. त्या समस्या सोडवून बंजारा समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. ते आज वाशीममध्ये बोलत होते. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज एकाच मंचावर आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषणाच्या सुरुवातीला बंजारा भाषेत संवाद साधत बंजारा समाजाची मने जिंकली.

सेवालाल महाराजांचे जागतिक दर्जाचे स्मारक उभारणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी वाशिममध्ये केली. सेवालाल महाराजांच्या स्मारकासाठी उर्वरित १०० कोटींची तरतूदही लवकरच करण्यात येईल असेही मुख्यमंत्री यांनी सांगितले. बंजारा समाजाच्या संस्कृतीचे जतन करण्यासाठी बंजारा अकादमीची घोषणा केली. तसेच वर्धा आणि यवतमाळ या दरम्यान पोहरागड स्टेशन उभारले जाईल असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

बंजारा भाषा टिकण्यासाठीही विशेष प्रयत्न केले जातील असेही मुख्यमंत्री म्हटले आहेत. ब्रिटिशांविरोधात सेवालाल महराजांनी पहिला एल्गार पुकारला त्यामुळे सेवालाल महाराज यांचे योगदान खूप मोठे आहे याची आठवण मुख्यमंत्र्यांनी करून दिली. तसेच बंजारा समाजाने तयार केलेल्या पारंपारिक वस्तू जगभरात पोहचाव्यात यासाठी विशेष प्रयत्न केले जातील असे आश्वासन मुख्यमंत्री यांनी दिले.

बंजारा समाजाचा विकास व्हावा यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू या समाजाच्या पाठिशी आम्ही आहोत असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. या कार्यक्रमात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर होते. या कार्यक्रमाला उद्धव ठाकरेंना आमंत्रित केल्याबद्दल बंजारा समाजाच्या प्रतिनिधींचे अभिनंदन केले.

Copy