बंगळुरूच्या ‘त्या’ घटनेवर विराटने व्यक्त केला संताप!

0

बंगळुरू : बंगळुरूच्या आयटी हबमध्ये नववर्षाच्या सेलिब्रशेनमध्ये एका तरुणीचा विनयभंग झाल्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला होता. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उठली आहे. भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली यानेही घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त करत आपला संताप व्यक्त केला. विराट कोहलीने आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ ट्विट केला आहे. कोहली म्हणतो की, बंगळुरूमध्ये ३१ डिसेंबरच्या रात्री जे काही घडले ते अत्यंत संतापजनक होते. त्या मुलीबाबत छेडछाड होत असताना, केवळ बघ्याची भूमिका घेणाऱ्यांना पुरूष म्हणणे चुकीचे आहे, असे विराट म्हणाला.

…तर तुम्ही काय केले असते?
जर तुमच्या कुटुंबातील एका स्त्री अशी घटना घडली असती, तर त्यावेळीही तुम्ही अशीच बघ्याची भूमिका घेतली असती, की तिला मदत केली असती? असा सवाल देखील विराटने उपस्थित केला. त्या मुलीने तोकडे कपडे घातले होते, म्हणून तिच्यासोबत अशी घटना घडली, असे म्हणणारे नराधमांच्या कृत्याला एकप्रकारे पाठबळ देतात. मात्र कोणत्याही व्यक्तीला किंवा त्या मुलीला तिने काय परिधान करावे, कसे राहावे, कसे जगावे हा तिचा प्रश्न आहे. प्रत्येकाला वैयक्तिक स्वातंत्र्य आहे. तोकड्या कपड्यातील मुलीची छेड काढणे जर कोणाला संधी वाटत असेल आणि जे लोक या कृत्याचे समर्थन करत असतील तर ते अतिशय भयावह आहे, असे कोहली पुढे म्हणाला.

काय होती घटना?
बंगळुरूत भर रस्त्यात मध्यरात्री दोन नराधम तरुणीवर जबरदस्ती करत असल्याचे सीसीटीव्ही फूटेजमध्ये समोर आले होते. कम्मनहळी भागात राहणारी ही तरुणी मध्यरात्री अडीच वाजता आपल्या घरी परतत होती. रिक्षातून उतरल्यानंतर घरी चालत परतत असताना, मागून आलेल्या दोन बाईकस्वारांनी तिला अडवलं आणि तिच्यावर जबरदस्ती केली. तरुणीने आरडाओरडा केल्यानंतर त्या नराधमांनी तेथून पळ काढला होता.

विकृत मानसिकता धोकादायक
या घटनेवर संताप व्यक्त करताना कोहली म्हणाला की, समाजात अशी विकृत मानसिकता असणे फार धोकादायक आहे. अशी माणसे आपल्या समाजात आहेत आणि मी त्या समाजाचा भाग आहे, याची मला लाज वाटू लागली आहे. आपण आपली विचारधारा बदलण्याची गरज आहे. बंगळुरुतील घटनेतील मुलगी तुमच्या घरातील असती, तर तुम्ही काय केलं असता, हा पुन्हा एकदा विचार करा, महिलांचा सन्मान करा जय हिंद, असेही कोहलीने व्हिडिओत म्हटले आहे.