Private Advt

फैजपूर शहर हादरले : सहा वर्षीय मुलाचा खून करीत पित्याचीही आत्महत्या

फैजपूर : सहा वर्षीय मुलाचा गळा दाबून खून करत पित्यानेही गळफास घेत आत्महत्या केली. फैजपूर शहरातील बसस्थानकाच्या मागे असलेल्या मिरची ग्राऊंड येथे ही धक्कादायक घटना शुक्रवार, 7 जानेवारी रोजी दुपारी उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली आहे. आर्यन निलेश बखाल (6) असे खून झालेल्या मुलाचे तर निलेश घनश्याम बखाल (35, मूळ रा.विवरे, ता.रावेर, ह.मु. बसस्थानकच्या मागे मिरची ग्राऊंड, फैजपूर) असे आत्महत्या केलेल्या पित्याचे नाव आहे. ही घटना नेमकी कशामुळे घडली? याबाबत अद्याप स्पष्ट कारण समोर आलेले नाही.

डेअरीच्या चालकाच्या आत्महत्येनंतर फैजपूरात खळबळ
बापू डेअरीचे संचालक असलेल्या निलेश घनश्याम बखाल (35) यांनी अलीकडेच शहरात डेअरी सुरू केली होती मात्र शुक्रवारी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास त्यांचा सहा वर्षीय मुलगा आर्यनसह निलेश यांचा गळफास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळल्यानंतर शहरात मोठी खळबळ उडाली आहे. निलेश यांनी शुक्रवारी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास पत्नीला बाजार व किराणा आणण्यासाठी बाजारात सोडल्यानंतर ते घरी परतले मात्र त्यानंतर हा प्रकार उघड झाल्याचे सांगण्यात आले.

पत्नी घरी आल्यानंतर उघड झाला प्रकार
बाजारासाठी गेलेल्या निलेश यांच्या सौभाग्यवती घरी आल्यावर घराचा दरवाजा बंद दिसून आला शिवाय दरवाजा ठोठावून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने शेजारचांच्या मदतीने दरवाजा उघडण्यात आला असता पिता-पुत्रांचे मृतदेह पाहता त्यांना जबर मानसिक आघात बसला. ही घटना वार्‍यासारखी फैजपूर शहरात पसरताच मोठी खळबळ उडाली आहे. तातडीने दोघांना यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभम तिळके यांनी मयत घोषीत केले. या घटनेमागचे कारण स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सहाय्यक पोलिस निरीक्षक सिद्धेश आखेगावकर व सहकार्‍यांनी घटनास्थही धाव घेत पाहणी केली.