फैजपूर शहरातील दुभाजकामुळे उलटला ट्रक

0

फैजपूर । येथील कृषी उत्पन्न बाजार समिती ते धाडी नदी पुलापर्यंत डांबरी रोडवर सार्वजनिक बांधकाम विभागाने टाकलेल्या साध्या दुभाजकावर वारंवार अपघात होत असूनही प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने वाहनधारक तथा रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानदार नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त
केला आहे.

बांधकाम विभागाचे होते दुर्लक्ष
जळगावकडून पपईने भरलेला ट्रक क्रमांक (पीबी १३ एबी ९००७) ६ रोजी रात्री १२.३० वाजता महात्मा गांधी सभागृहासमोर दुभाजकावर आदळून अपघात झाला. प्रसंगावधान राखून क्लिनरने उडी मारल्याने त्याचे प्राण वाचले. ड्रायव्हर किरकोळ जखमी आहे. ट्रकचे मागील टायर फुटून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. ट्रकमालकाच्या जवळपास एक लाखाच्या नुकसानीस कोण जबाबदार, असा प्रश्‍न आहे. याच ठिकाणी दोन दिवसांपूर्वी इंडिका कारचा अपघात होवून कारमधील महिलेच्या डोक्याला जबर दुखापत झाली होती. त्यामागे येणार्‍या मोटारसायकलचालक आदळून पाय फ्रॅक्चर झाला. सतत वर्दळ असलेला हा बर्‍हाणपूर-अंकलेश्‍वर रोडच्या मधोेमध ठिकठिकाणी साधी भिंत असलेला दुभाजकाचे ठोकळे टाकून उभारलेला हा दुभाजक आतापर्यंत अनेक वाहनांच्या नुकसानीस कारणीभूत ठरला आहे. काहींना आपले प्राण गमावून हातापायास मुकावे लागले आहे. तरीही सार्वजनिक बांधकामचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहे. याबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात असून प्रशासनाने हे दुभाजक काटून टाकावे किंवा दुभाजकांमध्ये प्रकाश व्यवस्था करावी व दोन्ही बाजुला रेडियम कलर द्यावा, अशी मागणी होत आहे.