फैजपूर येथे आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांसाठी एकदिवसीय उपवास

0

फैजपूर । महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांसाठी सहवेदना व्यक्त करण्यासाठी व शेतकरी विरोधी कायद्यांचा विरोध करण्यासाठी एकदिवसीय उपवास करण्यात आला. येथील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ हा उपवास कार्यक्रम संपन्न झाला. याचे आयोजन जळगव जिल्हा सर्वोदय मंडळ, शेतकरी शेतमजुर पंचायत यांच्या वतीने करण्यात आले. सर्वोदय मंडळाचे सचिव शाम मिना भानुदास यांनी सकाळी 10 वाजता उपवासास प्रारंभ केला. सर्वोदय मंडळ व शेतकरी शेतमजुर पंचायत जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील यांनी सुध्दा सहभाग घेतला.

उपवास करुन शेतकर्‍यांप्रती व्यक्त केल्या सहवेदना
आजच्या दिवशी उपवास कार्यक्रम घेण्याचे प्रयोजन असे आहे की, 19 मार्च 1986 रोजी यवतमाळ जिल्ह्यातील चील-गव्हाण गावचे शेतकरी साहेबराव करपे या शेतकर्‍याने शेती कर्जाचे बोजाने व वारंवार होणार्‍या नापिकीमुळे कुटुंबासह आत्महत्या केली होती. एकाचवेळी कुटुंबातील सहा सदस्यांनी केलेल्या आत्महत्येने राज्य हादरुन गेले होते. त्यानंतर सुध्दा अनेक शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहे. या सर्व आत्महत्याग्रस्त भुमिपुत्रांचे कुटुंबीय व अन्यायग्रस्त शेतकरी यांचे प्रती सहवेदना व्यक्त करण्यासाठी रविवार 19 रोजी हा उपवास कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी नगरसेवक शेख कुर्बान यांनी उपवासस्थळी येवून आपल्या सहवेदना व्यक्त केल्या. आजच्या या उपवासात प्रभाकर सपकाळे, वासुदेव गोरले, सुमित साळुंके, हर्षद काकडे, आनंद भालेराव, सचिन भिडे, अजय पेठे यांच्यासह सर्वोदय जिल्हा कार्यकारिणी सदस्य सचिन पाटील यांनी सहभाग घेतला. या उपवास कार्यक्रमात काही कार्यकर्त्यांनी आपआपल्या घरी उपवास करुन शेतकर्‍यांप्रती सहवेदना व्यक्त केल्या.