फैजपूर नगरीत युवारंग महोत्सवाचे थाटात उद्घाटन

0

 फैजपूर(उमाकांत पाटील) । विद्यार्थी कला विभागाला शासनाकडून लोककला अ‍ॅकेडमी स्थापन करण्याचा आपला मानस आहे. काळ कोणासाठीही थांबत नसल्याने क्षणाक्षणाचा सदुपयोग प्रत्येकाने करावा. आज तुमच्यासमोर कुलगुरु म्हणून असतांना माझ्या महाविद्यालयीन जीवनाचे दिवस आठवतात. मला गाण म्हणता येेत नाही मात्र शेवटी एक ओळ सांगतो ‘रिश्ते से तोेे हम तुम्हारे टिचर लगते हैं मगर आज हम कुलगुरु है’, ‘हारे या कोई बाजी, तभी तो होगी जित किसीकी’ असे सांगून जिंकणार्यापेक्षा अपयशी होणारे विद्यार्थी तितकेच महत्वाचे असतात, असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष कुलगुरु प्रा. पी.पी. पाटील यांनी केले. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ विद्यार्थी कल्याण विभाग आणि धनाजी नाना महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विद्यापीठस्तरीय युवारंग 2016 चा उदघाटन सोहळा ऐतिहासिक फैजपूर नगरीच्या पावन भूमित मोठ्या थाटात संपन्न झाला. याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. सकाळी 9 वाजता शिवाजी महाद्वारासमोर असलेल्या ज्येेष्ठ स्वातंत्र्यसेनानी कै. धनाजी नाना चौधरी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण तसेच स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाप्रती उभारण्यात आलेल्या दिपस्तंभाला कुलगुरु प्रा. पी.पी. पाटील, सिनेकलावंत संदिप पाठक या मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण केले. दरम्यान, एनसीसी कमांडर, तुतारी व वाद्यांच्या गजरात नऊवारी पातळ व श्रृंगार करुन नटलेल्या धनाजी नाना महाविद्यालयाच्या विद्यार्थीनींनी मान्यवरांचे स्वागत केले.

व्यासपीठावर यांची होती उपस्थिती
यात याप्रसंगी व्यासपीठावर सिनेअभिनेता संदिप पाठक यांसह कुलगुरु प्रा. पी.पी. पाटील, युवारंग कार्याध्यक्ष प्रा. दिलीप पाटील, संस्थाध्यक्ष तथा स्वागताध्यक्ष माजी आमदार शिरीष चौधरी, प्रा. कुलसचिव डॉ. ए.बी. चौधरी, मसाका चेअरमन शरद महाजन, तापी परिसर विद्यामंडळाचे चेअरमन लिलाधर चौधरी, सचिव प्रा. एम.टी. फिरके, उपाध्यक्ष डॉ. एस.के. चौधरी, प्रा. के.आर. चौधरी, प्राचार्य डॉ. पी.आर. चौधरी, प्राचार्य व्ही.आर. पाटील, प्राचार्या जयश्री नेमाडे, प्राचार्य आर.एल. चौधरी, माजी खासदार गुणवंतराव सरोदे, डॉ. अतुल सरोदे, सुमन पाटील, शामला सरोदे, सावद्याच्या नगराध्यक्षा अनिता येेवले, नगरसेवक मिलींद वाघुळदे, विद्यार्थी प्रतिनिधी धनश्री चांदोड, डिगंबर पवार, विशाखा महाजन, प्रा. नितीन बडगुजर, प्रा. सत्यजित साळवे, प्राचार्य उदय कुळकर्णी, डॉ. संजय शेखावत, डॉ. आर.एच. गुप्ता, डॉ. एफ.एन. महाजन, प्रा. संजय खैरनार, एन. मुक्टोचे अध्यक्ष प्रा. संजय सोनवणे, समन्वयक डॉ. ए.आय. भंगाळे, प्रसिध्दीप्रमुख डॉ. आर.आर. राजपूत, डॉ. शरद बिर्हाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

कुलगुरुंनी स्पष्ट केली युवारंगविषयी विद्यापीठाची भूमिका
शिस्तबध्द रितीने रंगमंच क्रमांक एक कै. कुसुमताई मधुकरराव चौधरी रंगमंचावर उद्घाटनप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष कुलगुरु प्रा. पी.पी. पाटील यांनी आपल्या मनोगतात युवारंगविषयी विद्यापीठाची भूमिका तसेच पुढील वाटचालीबद्दल भूमिका स्पष्ट करतांना सांगितले की, भारतात नॅक प्रमाणित विद्यापीठांमध्ये उमविचा 59 वा क्रमांक असून विद्यापीठामार्फत समाज, विद्यार्थी व देशासाठी विविध योजना, शिबीर, उपक्रम राबविले जात आहे. याचा अभिमान आहे. विद्यापीठामार्फत 75 लाख रुपये विद्यार्थी सहायता निधी, नाममात्र 10 रुपये किंमतीत प्रत्येक विद्यार्थ्याचा सव्वा दोन लाख रुपयांचा विमा उतरविला जातो. विविध योजना व उपक्रमांच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेली मुंबई विद्यापीठाची मक्तेदारी मोडीत काढत उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने महाराष्ट्रातून अव्वल क्रमांक प्राप्त केला असल्याचे सांगितले.

रिश्ते में तो हम तुम्हारे
टीचर लगते है, नाम है पी.पी!
उद्घाटनाच्या कार्यक्रमात तरुणाईचा उत्साह शिगेला पोहोचलेला होता. कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. पी. पी. पाटील यांनीही या कार्यक्रमात चांगलीच रंगत आणली. आपल्या भाषणात त्यांनी शेरोशायरीनी रंगत आणली. रिसर्चच्या क्षेत्रात जबरदस्त कामगिरी करणारे कुलगुरू यावेळी तरुणाईचा जल्लोष बघून स्वताच तरुण झाल्याचे फील करत होते. एरव्ही गंभीर स्वभावाचे म्हणून ओळख असलेले कुलगुरू यावेळी चांगलेच हास्याचे फवारे उडवत होते. यावेळी त्यांनी आपल्या कॉलेजच्या आठवणी देखील सांगितल्या. मी आयुष्यात गीत गायले नाही , माझे गीत बाथरूम पर्यंतच सीमित राहिल्याचे सांगताच उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये हशा पिकला. भाषण संपविताना तर त्यांच्यातला अभिनेता देखील बाहेर आला. रिश्ते में तो हम तुम्हारे टीचर लगते है, नाम है पी.पी! असं म्हणत त्यांनी आपल्या भाषणाचा शेवट केला ज्याला वन्स मोरची दादही मिळाली.

माजी आमदार चौधरींची बहारदार कव्वाली
संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार शिरीष चौधरी यांनी सांगितले की, येथे सर्व मान्यवरांच्या स्वागत करतांना अत्यंत आनंद होत आहे. आज आपण एका ऐतिहासिक भुमित बसलेले आहे. त्यामुळे या भुमिला अनन्य साधारण महत्व आहे. आपल्यातील नेतृत्व गुण विकसित व्हावे हा मुख्य उद्देश युवारंगचा असून सर्वांनी या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, असे आवाहन केले. त्यांनी यावेळी जुनी पुरानी ‘हम छुपे रुस्तम है … जमीं तो क्या हम आसमाँ की खबर रखते हैं …!’ ही कव्वाली म्हणून युवकांची टाळ्यांच्या गजराने दाद मिळविली.