फैजपूरात कन्टेन्मेंट झोनमधील रहिवासी व्यापार्‍यांना दुकाने उघडण्यावर निर्बंध

0

फैजपूर : दोन महिन्यानंतर शहरातील दुकाने गुरुवारपासून सुरू होत असून पालिका प्रशासनाने त्यासाठी नियमावली जाहीर केली आहे. यात प्रामुख्याने शहरातील तसेच इतर शहरातील कन्टेन्मेंट झोनमधील रहिवासी असणार्‍या व्यापार्‍यांना फैजपूर शहरातील त्यांचे दुकान उघडता येणार नाही शिवाय कंन्टमेंट झोनमध्ये दुकाने बंदच राहणार असून नियमांचे पालन न केल्यास थेट कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे मुख्यधिकारी किशोर चव्हाण यांनी आदेशात म्हटले आहे. दरम्यान, या आदेशाने काही व्यावसायीकांना दिलासा तर काहींचा हिरमोड झाला आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाची खबरदारी
कोरोना संसर्गजन्य आजार असल्याने त्याचाच एक भाग म्हणून फैजपूर शहरात प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रशासनाकडून राबवल्या जात आहेत. तसेच फैजपूर शहरातील दुकाने उघडल्यावर मास्क व हातात ग्लोज घालणे अनिवार्य करण्यात आले आहे शिवाय निर्जंतुकीकरणे करणे, दुकानात ए.सी.बंद ठेवणे, ग्राहकांमध्ये शारीरिक सामाजिक अंतर ठेवावे लागेल, प्रत्येक दुकानदारास आपल्या काऊंटरवर सॅनिटाईजर ठेवणे आवश्यक असून दुकानांसमोर एका वेळेस फक्त 5 नागरीकांना उभे राहता येणार असून ग्राहकांना सुद्धा मारक घालणे व शारीरिक अंतर 6 फुटाचे ठेवणे अनिवार्य आहे तसेच 60 वर्षावरील व्यक्तींना तसेच ज्यांना मधुमेह,कर्करोग -हदयरोग अथवा अन्य दुर्धर आजार आहे अशांनी दुकानात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष काम करू नये, शहरातील तसेच इतर शहरातील कन्टेनमेंट झोन मधील रहिवाशी असणार्‍या दुकानदारांना फैजपूर शहरातील त्यांचे दुकान उघडता येणार नाही व अत्यावश्यक सेवेतील दुकानदारांनी शासनाचे आदेशानुसार ठरलेल्या वेळी दुकाने सकाळी 10 ते 5 या वेळेतच उघडावी व बंद
करावी, जर दुकानात गर्दी झालेली असेल सोशल डिस्टसींगचे पालन न झाल्यास दुकान तत्काळ बंद करण्यात येईल, असेही आदेशात नमूद आहे. वरील सर्व नियम व सुचना नागरीकांच्या सुरक्षेसाठी असून सहकार्य करावे, असे आवाहनही पालिका मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी केले आहे.