फैजपूरात ईद होईपर्यंत मार्केट उघडू नये

0

फैजपूर : देशात कोरोना विषाणू आढळल्याने दिल्ली येथील संपूर्ण देशात तबलीगी जमातमुळे कोरोना आला, अशा बातम्या प्रसारीत झाल्याने संपूर्ण मुस्लीम समुदायाला टारगेट करण्यात आले तर फैजपूर शहरात कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव होवू नये यासाठी खबरदारी म्हणून रमजान ईद पर्यंत खरेदी-विक्रीसाठी मार्केट उघडण्याची परवानगी देवू नये, अशा मागणीचे निवेदन इन्सिडेंट कमांडर तथा फैजपूर प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांना मंगहवारी देण्यात आले.

मार्केट खुले झाल्यास विषाणूचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती
या निवेदनात म्हटले आहे की, संपूर्ण जगासह आपल्या भारत देशातही सर्वत्र कोरोना विषाणूंचा प्रार्दुभाव झपाट्याने वाढत आहे तसेच कोरोना विषाणूंचे रुग्ण हे सर्वाधिक आपल्या महाराष्ट्र राज्यात आहेत तर असे असले कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव अद्यापही आपल्या यावल-रावेर तालुक्यात झालेला नाह तसेच फैजपूर शहरातदेखील सदरील विषाणुंचा शिरकाव झालेला नाहीव तो होवू सुध्दा द्यायचा नाही. जिल्हाधिकारी यांनी आपल्या संदर्भीय पत्रकान्वये 3 मे 2020 रोजी कडक आदेश पारीत करून कोरोना विषाणु या रोगाचे वाढीव प्रकार होवू नये म्हणून दररोज संध्याकाळी 7 ते सकाळी 7 पर्यंत संचारबंदी आदेश लागू केले आहे. कोरोना विषाणुंचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी सर्वत्र लॉक डाऊन आहे व सर्व लोक हे कामधंदा बंद करून घरात बसलेले आहेत तसेच आता रमजान महिना सुरू असून रमजान ईद तोंडावर आहे त्यामुळे आपण जर फैजपूर शहरात मार्केट सुरू करण्याची परवानगी दिली तर लॉकडाऊन मुळे कामधंदा बंद करून घरी बसलेले लोक खरेदी विक्रीसाठी घराबाहेर पडतील तसेच बाहेरील गावचे व्यापारीसुध्दा व्यापार करण्यासाठी चोरी छुप्या मार्गाने फैजपूर शहरात दाखल होतील व एकदमच सर्वत्र गर्दी होईल व सदरील गर्दी मध्ये जर एखादा कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती आला तर त्याच्यामुळे संपूर्ण फैजपूर शहरात व परीसरात कोरोना विषाणुंचा फैलाव होईल व आणखी सर्वत्रमुस्लीम बांधवांचे नाव खराब होईल व रमजान ईदला गाल-बोट लागेल. काही लक्षणे दिसत नसल्यावरही चांगल्या माणसालाही कोरोना होवू शकतो. यामुळे जर मार्केट खुले केले तर फैजपूर शहरात कोरोना विषाणुंचा प्रार्दुभाव वाढून सर्वत्र फैलेल व फैजपूर शहराचे वातावरण दूषित होईल तसेच फैजपूर शहरातील व परीसरातील नागरीकांच्या आरोग्याला धोका निर्माण होईल. या सर्व गोष्टी विचारात घेवून ब खबरदारी म्हणून आम्ही सर्व खालील सह्या करणारे हिंदू-मुस्लीम बांधव आपणास हे निवेदन सादर करीत असून रमजान ईद पर्यंत आपण फैजपूर शहर व परीसरात कोणत्याही प्रकारची मार्केट सुरू करण्याची परवानगी देवू नये, अशी अपेक्षा व्यक्ती करण्यात आली आहे.

यांची निवेदनावर स्वाक्षर्‍या
या निवेदनावर उपनगराध्यक्ष रशीद तडवी, भाजपा गटनेता मिलिंद वाघूळदे, राष्ट्रवादी काँग्रेस गटनेता शेख कुर्बान, काँग्रेस गटनेता कलिम खां मण्यार, अब्दुल रऊफ जनाब, माजी नगरसेवक शेख जफर, शिवसेना नगरसेवक अमोल निंबाळे, नगरसेवक देवेंद्र साळी, सामाजिक कार्यकर्ते शेख जलील हाजी सत्तार, रवींद्र होले, डॉ.अब्दुल जलील, सय्यद कौसर अली, आसीफ मॅकनिकल, शाबाजखान हाजी शकील खान, काँग्रेस शहर अध्यक्ष शेख रीयाज, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष अनवर खाटीक, सामाजिक कार्यकर्ते रईस मोमीन, इरफान शेख, मोहसीन उर्फ सागर खान यांच्यासह फैजपूर शहरातील जवळपास तीनशे हिंदू -मुस्लीम बांधवांच्या स्वाक्षर्‍या आहेत. या निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांना रवाना करण्यात आल्या आहेत.

Copy