Private Advt

फैजपुरातील व्यावसायीकाला 43 हजारांचा ऑनलाईन गंडा

फैजपूर : फैजपूर येथील व्यावसायीकाची 43 हजाराची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी बुधवार, 23 मार्च रोजी फैजपूर पोलिस ठाण्यात अज्ञात मोबाईल धारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञाताविरोधात गुन्हा
सुनील अशोक जैन (48, रा.सराफ गल्ली, फैजपूर, ता.यावल) यांचे आरसीसी पाईप सप्लायरचे दुकान आहे. रविवार, 20 मार्च रोजी सुनील जैन हे दुकानावर असताना त्यांना अनोळखी नंबरवरून रणदीप सिंग बोलत असल्याचे सांगत फोन आला. त्याने सांगितले की, माझ्याकडील 900 एमएमचे 50 पाईप जळगाव येथे पोहोच करायचे आहेत त्यासाठी तुम्हाला औरंगाबाद येथील सागर पाईप येथून पाईपांची उचल करावी लागेल. त्यानुसार सुनील जैन यांनी औरंगाबाद येथून पाईपाची उचल केली व इंडियन डिफेन्स करीयर सर्व्हिस अ‍ॅकेडमी, कोल्हे हिल्सजवळ, विवेकानंद शाळेमागे, जळगाव येथे पाईप आणल्यानंतर गेटपाससाठी तक्रारदार जैन यांच्या मुलाच्या मोबाईलवरून 43 हजारांची रक्कम ऑनलाईन पद्धत्तीने पाठवून तक्रारदाराची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर सुनील जैन यांनी फैजपूर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिल्याने बुधवारी रात्री उशिरा फैजपूर पोलीस ठाण्यात रणजित सिंह नामक व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.