फेसबुक एक हाताळणे

0

साधारणः चार वर्षांपूर्वी मी फेसबुकवर रुजू झालो, सुरुवातीला मिळेल त्याला विनंत्या पाठवणे आणि आलेल्या पटापट स्वीकारणे यात मोठा पुरुषार्थ वाटत होता, काही महिने सगळे छान छान वाटत होते, सुरुवातीला इथे रुजू होणारा नवखा असतो. यामुळे फेसबुकची आचारसंहिता नेमकी काय असते याची जाणीव असण्याचे कारण नसते. जे जे मनाला, डोळ्यांना भावेल त्याला पसंती देत आणि आवश्यक तिथे प्रतिक्रिया देत आपला प्रवास सुरू असतो. विशेषतः मुलींच्या रिक्वेस्ट आल्या की नवा युजर डोळे झाकून मित्रयादी वाढवत जात असतो. काही नाठाळ लोक मुलींच्या नावाने खोटे अकाउंट काढून मस्त मजा घेताना याच माध्यमात दिसतात. पुढे एक गोष्ट लक्षात यायला लागली की, आपल्या विचारांशी कोणत्याही पातळीवर जुळत नाहीत असेही खूप मित्र नाहक अंगावर घेऊन ठेवले आहेत. फेसबुकवर मला ट्यागी, भोगी, रोगी आणि योगी अशा सगळ्या प्रकारचे मित्र अनुभवायला मिळाले.

समजा तुमच्या मित्रयादीत 100 लोक असतील तर त्यातले 40 टक्के रोगी म्हणजे आजारी असतात, मग ते कोणत्याही पोस्टला कसलाही प्रतिसाद देत नाहीत, जेवढे साहित्य इथे येईल त्यावरून नजर फिरवून हे लोक पुढे जात असतात, अगदी एखाद्या विनोदालासुद्धा प्रतिसाद देत नाहीत, 20 टक्के ट्यागी असतात, कोणतीही फडतूस पोस्ट तुम्हाला न विचारात टॅग करणे हा त्यांचा जन्मसिद्ध अधिकार असतो किंवा एखाद्या टग्या मित्राचा रस्त्यावर मोटारबाइकवर तलवारीने केक कापतानाचा फोटो टाकतात, आपण त्याला बाप जन्मातही ओळखत नसतो. आपण हरकत घेतलीच तर सॉरी नावाची थप्पड ते लगावतात. केवळ 30 टक्के लोक या संधीचा सुंदर उपभोग घेताना दिसतात ते भोगी आणि 10 टक्के लोक खरोखर योगीच असतात, तुमची पोस्ट कितीही लांबलचक असो, पहिल्या 10 सेकंदात त्यांना आवडते, ते डोळे मिटून लाईक करीत असतात.

आपल्या विचारांशी विसंगत पोस्ट जेव्हा सुरू होतात तेव्हा जीव कासावीस होतो, त्यावर कडी म्हणजे अशा पोस्ट तुम्हाला ट्याग केलेल्या असतात. काही फेसबुकी मित्र तर एवढे भन्नाट असतात की जणू ते दिनविशेषची वाटच पाहत असावेत असे वाटते. सोमवारी शंकराचा, मंगळवारी देवीचा तर बुधवारी दत्ताचा फोटो टाकतात आणि पाच पन्नास लोकांना ट्याग करतात, काही महाभाग तर दर गुरुवारी गजानन महाराजांचा फोटो न चुकता टाकतात आणि वरून धमकी पण देतात की मी बघतोच आता कोण लाईक करीत नाही ते थोडक्यात बाष्कळ, फालतू, अर्थहीन आणि सवंग कचरा डम्प करण्याचे फेसबुक हे एकमेव ठिकाण समजणारे काही कमी नाहीत हे लक्षात येते. समजा तुम्ही अशा लोकांना अनफ्रेंड केले तर त्यांचा भयानक अपमान झाल्याचा साक्षात्कार त्यांना होऊन ते इनबॉक्समध्ये तुमचे बौद्धिक घ्यायला सुरुवात करतात.
खरंतर फेसबुक हे अतिशय प्रवाही आणि लोकमंगलाचे सहज सोपे असे माध्यम आहे, त्याचा उपयोग माहितीची देवाणघेवाण, कलांचे प्रदर्शन, साहित्याचा आस्वाद आणि अपरिचित बाबी शेयर करण्यासाठी केला जाऊ शकतो. अर्थात इथे येणारा व्यक्ती कोणता उद्देश घेऊन येते यावर बरेच काही अवलंबून असते. काही आंबट शौकीन निव्वळ चिडीमारी करायला इथे येतात हेही लपून राहत नाही. यांचा मुलींबाबत अभ्यास असतो, हौशी मुली नवनवे फोटो टाकत असतात. हे फोटो दिसले की आंबट शौकीन त्यावर तुटून पडतात, थोडा जरी प्रतिसाद मिळाला की सरळ मुलींच्या इनबॉक्समध्ये प्रवेश करतात, अशा प्रकारात अनेक मुलींचे आयुष्य बरबाद झाल्याचे आपण सतत वाचत असतो. त्यामुळे मुली, महिलांनी इथे आल्यावर कोणती काळजी घ्यायला हवी हे समजून घेतले पाहिजे.

हा सगळा अनुभव लक्षात घेता अलीकडे मी चाळणी लावली आहे, ज्यांची विनंती येते, त्यांचे प्रोफाइल मी चेक करतो. आगामी मित्र खरंच गंभीर आहे की नुसताच उडाणटप्पू, एसटीडी पीसीओ आहे हे लक्षात येते. कोणत्याही विषयावर त्याची स्वतःची काही मते त्याने पोस्ट केली आहेत का? त्याची अभिरुची, छंद, स्वभाव, गांभीर्य लक्षात आल्यावर तो माझ्या चाळणीतून आत येऊ शकतो अन्यथा मी त्याची विनंती डिलीट करतो. कारण हे एकमेव माध्यम असे आहे की, तुम्ही आवड ठेवू शकता की कुणाला तुम्हाला सहन करायचे आहे ते. माझी यादी अनेकवेळा पाच हजारांच्या जवळ आली, पण मी वारंवार तपासून अनेकांना नारळ दिले. अजूनही अनेक असे लोक माझ्या यादीवर आहेत की ज्यांनी खाते उघडले तेव्हापासून काहीही पोस्ट केले नाही किंवा तुम्ही काय महत्त्वाचे टाकता त्याच्याशी त्यांना काहीच देणे घेणे नसते, त्रास होतोय यार अशांचा, ‘दोस्त कम चाहिये लेकिन उनमे दम चाहिये’, तुम्हाला काय वाटते?

( लेखक दैनिक जनशक्तिचे कार्यकारी संपादक आहेत.)

– पुरुषोत्तम आवारे पाटील
9892162248