फेसबुकवर लवकरच ‘पॉप अप’ पोस्ट

0

मुंबई । फेसबुकच्या युजर्सला लवकरच न्यूज फिडमध्ये ‘पॉप अप’ स्वरूपात पोस्ट दिसणार असून याला लाईक/ कॉमेंट करता येणार आहे.

पॉप अप विंडोजचा नव्याने परिचय देण्याची आवश्यकता नाही. वेब ब्राऊजरवर अनेक जाहिराती वा सबस्क्रिप्शनचे विनंतीवजा आवाहन या माध्यमातून आपणास हा प्रकार माहिती आहे. या ब्राऊजरच्या मुख्य भागापेक्षा लहान असणार्‍या विंडोज असतात. आता फेसबुक आपल्या युजर्सला लवकरच याच पध्दतीच्या ‘पॉप अप’ स्वरूपात पोस्ट दर्शविणार आहे. कुणीही युजरने आपल्या वॉलवर एखादी पोस्ट टाकल्यानंतर त्यावर लाईक/कॉमेंट वा शेअरिंग हे प्रकार सुरू होतात. या दरम्यान संबंधीत युजरला नोटिफिकेशनच्या माध्यमातून माहिती मिळत असते. आता याच पध्दतीने युजरच्या पोस्टवर लाईक/कॉमेंट/शेअरिंग झाल्यास नोटीफिकेशनच्या ऐवजी चॅटींग बॉक्सजवळ एका लहान विंडोजमध्ये त्याला याची सर्व माहिती मिळेल. येथे तो युजर या पोस्टवरील कॉमेंटला उत्तरदेखील देऊ शकेल. हे सारे होत असतांना तो युजर ब्राऊजरच्या मुख्य भागात फेसबुकची न्यूज फिड पाहू शकेल. अर्थात न्यूज फिडवरून लक्ष न हटविता तो आपल्या पोस्टवरील संवादात सहभागी होऊ शकेल. ही विंडोज मिनिमाईज वा डिलीटदेखील करता येणार आहे. काही युजर्सच्या माध्यमातून आपण या प्रकारची चाचणी घेत असल्याच्या वृत्ताला फेसबुकने दुजोरा दिला आहे. परिणामी आगामी काही महिन्यांमध्ये हे फिचर सर्व युजर्सला मिळू शकते.